कोविड योद्ध्यांना नुसताच ‘मान’; दोन महिन्यांचे थकले मानधन - A - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:07+5:302021-07-19T04:22:07+5:30
बीड : कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून मान-सन्मान दिला; परंतु आरोग्य विभागाकडून या ...
बीड : कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून मान-सन्मान दिला; परंतु आरोग्य विभागाकडून या योद्ध्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतनच दिले नसल्याचे समोर आले आहे. निधी नाही तसेच वेगवेगळ्या त्रुटी काढून वेतन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती आजही गंभीर आहे. रोज दीडशेपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळत आहेत. हीच स्थिती मार्च महिन्यापासून ते मेअखेरपर्यंत गंभीर होती. खाटा आणि मनुष्यबळही अपुरे पडत होते. त्यामुळे तीन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीवर पदभरती करण्यात आली होती. यात वॉर्डबॉयपासून ते डॉक्टरांपर्यंतचा समावेश होता. या सर्वांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीव धोक्यात घालून काम केले. आजही ते प्रामाणिक कर्तव्य बजावत आहेत. असे असले तरी त्यांचे वेतन वेळेवर देण्यात आरोग्य विभाग कुचराई करत असल्याचे दिसते. मे व जून महिन्याचे वेतन अद्यापही काही कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. निधी नाही व अर्जातील त्रुटी सांगून त्यांना वेतन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी संतापले आहेत. वेळीच वेतन न दिल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
वॉर्डबॉयचा सीएस समोर ठिय्या
वेतनाच्या मागणीसाठी काही वॉर्डबाॅय सोमवारी सायंकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्याकडे गेले. त्यांनी आक्रमक होत वेतनासाठी दालनात ठिय्या मांडला. डॉ. साबळे यांनी सर्व संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावून घेत तात्काळ वेतन अदा करण्याच्या सूचना केल्या. तसेच यापुढे वेतन थकणार नाही, याची काळजी घेण्याबाबतही सांगितले.
---
आम्ही वारंवार वॉर्डबॉयच्या वेतनासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलो; परंतु अद्यापही प्रश्न मार्गी लागलेला नाही. काम करूनही वेतन कमी दिले जाते तर काहींना दिलेलेच नाही. आता सहनशीलता संपली आहे. आता आम्ही यावर आवाज उठविण्यासाठी आंदोलन करणार आहोत.
-दीपक थोरात, सामाजिक कार्यकर्ते
--
वेतन का थकले आणि इतर काही अडचणी आहेत का, याची चौकशी करण्यास सांगितले आहे. दोन दिवसांत सर्व वेतन दिले जाईल. माझ्या कार्यकाळात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. काम केल्यास वेतनावर त्यांचा हक्क आहे.
-डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
---
एकूण कोरोनाबाधित ९४ हजार ४५७
एकूण कोरोनामुक्त ९० हजार ५९२
एकूण मृत्यू २ हजार ५७०
उपचार सुरू १ हजार २९५