बिबट्यानंतर गव्याची एंट्री; आष्टी तालुक्यातील कऱ्हेवडगाव परिसरात दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 03:56 PM2021-03-01T15:56:12+5:302021-03-01T15:58:30+5:30
वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गव्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
- अविनाश कदम
आष्टी : तालुक्यामध्ये बिबट्याच्या दहशतीने शेतक-यांनी शेतातील उभे पिक सोडून दिले होते. शेतक-यांमध्ये प्रचंड प्रमाणात भिती निर्माण झाली होती. ही भिती संपते तोच आता सुगीच्या दिवसांमध्ये क-हेवडगांव येथील टकले वस्ती शेजारील शेतामध्ये शेतकऱ्यांना गव्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभाग घटनास्थळी दाखल झाले असून याभागात विशेष लक्ष ठेवून आहे.
तालुक्यातील क-हेवडगांव येथील शेतकरी राम नागरगोजे,अंबादास बांगर,जालिंदर नागरगोजे,विजय विधाते हे शेतातून रविवार दि.२८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ च्या दरम्यान ज्वारी काढून परतत असताना टकले वस्तीजवळील भागिनाथ टकले यांच्या शेतात असलेल्या कपाशी मध्ये अचानक मोठा प्राणी समोर दिसला प्रचंड घाबरलेल्या परिस्थितीत त्यांनी कधी न पाहिलेला प्राणी दिसल्याने गाडीवरून तीघे असल्याने लांबून त्यांनी गाडीच्या उजेडात मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले असून हे व्हिडिओ वनविभागाला पाठवले असून घटनास्थळी वनविभागाचे पथक रवाना झाले आहे. या भागात विषेश लक्ष ठेवून आहे.
गव्याच्या पाऊलखुणांची चाचपणी केली असून गवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.गव्याचा शोध घेण्याचे वनविभागाचे काम सुरू आहे. या परिसरात प्रथमच गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी वनरक्षक मातावळी एन.के.काकडे,वनरक्षक आष्टी डी.जे.चव्हाण,चालक बी.डी.टाफरे दाखल झाले असून गव्याला ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.
वनविभागाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पोटासाठी अन्न शोधत असलेला गवा आता मानव वस्तीमध्ये शिरला असून गव्याचे दर्शन झाल्यानंतर नागरिकांनी एकत्र जमून मागे न लागता गोगांटा टाळावा गव्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे वनविभागाची गाडी पेट्रोलिंग करेल अधिकारी घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.पाळीव प्राण्यांसह नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी
- शाम सिरसाठ ( वन परिक्षेत्र अधिकारी आष्टी )
ग्रामस्थांमध्ये भीती
जंगली गव्यांचे दर्शन आम्हाला जवळून झाले आहे. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी शेजारील तालुका असलेल्या जामखेड येथील वंजारवाडीचे शेतकरी संतोष दराडे यांना गव्याने हल्ल्यात जखमी केले आहे. वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करून या ठिकाणी रात्रीची गस्त वाढवण्यात यावी.
- राम नागरगोजे, शेतकरी