अंबाजोगाई नगर परिषदेवर माकपचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:47 AM2019-06-18T00:47:44+5:302019-06-18T00:48:27+5:30
कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली शिकलकरी समाज व वंचित घटकातील शेकडो गोरगरीब, मजूर लोकांनी सोमवारी रोजी नगर परीषद कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : ‘शहर व परिसरात राहणारा शिकलकरी समाज व वंचित घटकातील गोरगरीब लोक यांना अंबाजोगाई येथील सरकारी जमिनीवर स्थलांतरीत करून कायमचे घर देण्यात यावे, सर्व्हे नं.५१५ मधील न.प. मालकीची जागा ताबडतोब ताब्यात घेवून त्यावरील तसेच मुख्य रस्त्यांवरील अतिक्र मणे हटवा, सर्व गलिच्छ वस्त्यांची स्वच्छता करा, शहराची अंतर्गत पाईप लाईन बदलून आठवड्यातून दोनदा पिण्याचे पाणी द्या या व इतर मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुनही दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली शिकलकरी समाज व वंचित घटकातील शेकडो गोरगरीब, मजूर लोकांनी सोमवारी रोजी नगर परीषद कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
शासकीय जमीनीवर बेघरांना शासकीय ‘सर्वांसाठी घरे’ योजनेतून घरे मिळावीत या प्रमुख व इतर ६ मागण्यांसंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.बब्रुवाहन पोटभरे हे सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे.विविध प्रकारे हे प्रश्न सोडून घेण्यासाठी कॉ.पोटभरे हे प्रयत्न करीत आहेत.
निवेदनाद्वारे नगर परिषद प्रशासनास इशारा दिला होता. याबाबत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना कळविले होते. त्यानुसार सोमवारी शिकलकरी समाज व वंचित घटकांतील शेकडो स्त्री-पुरूष, वयोवृद्ध नागरिक व लहान मुले, गोरगरीब लोकांनी रणरणत्या उन्हात मोर्चा काढून नगर परिषदेसमोर निदर्शने केली. घोषणा दिल्या. कार्यालयात घुसून घेराव घातला. याप्रश्नी प्रशासनाने या लोकांना तात्काळ न्याय द्यावा अन्यथा २५ जून नंतर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. झालेल्या परिणामांना नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी यावेळी दिला आहे. तर मुख्याधिकाऱ्यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन न.प.अभियंता कस्तुरे यांनी स्वीकारले.
सदरील निवेदनावर कॉ. बब्रुवाहन पोटभरे, पूनमसिंग टाक, छायाबाई तरकसे, गोरखसिंग भोंड, अस्मिता ओहाळ, दीपकसिंग गोके, पूजा मोरे, वीरसिंग टाक, अनिल ओहाळ, अशोक ढवारे, तेजासिंग गोके, मीरा पाचपिंडे, मीरा जोगदंड आदींसह इतरांच्या स्वाक्ष-या आहेत. मोर्चात सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील शिकलकरी समाज, मिलींदनगर व येल्डा रोड परिसरातील शेकडो बेघर कुटुंबे, वंचित समाज बांधव हे सहभागी झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा दरम्यान, आंदोलकांनी घोषणाबाजी करीत नगर परिषद कार्यालय परिसर दणाणून सोडला होता.