बुरुजांना तडे, भिंतीना भेगा; निधीअभावी ऐतिहासिक धारूर किल्ला मागील बाजूने होईल भुईसपाट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 07:27 PM2023-03-16T19:27:04+5:302023-03-16T19:41:09+5:30
संतापजनक! ऐतिहासिक धारूरच्या किल्ल्याच्या भिंतीला भेगा; समोरून चकाकी, पाठीमागून हानी
- अनिल महाजन
धारूर : शहराचे वैभव असणारा येथील ऐतिहासिक किल्ला पुरातत्त्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केला. यानंतर पाच वर्षांपूर्वी सात कोटी रुपये खर्च करून किल्ल्याचा समोरील भाग चकाचक केला. मात्र, पुढील निधी येणे बंद झाल्याने सध्या मागील बाजूने हा किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्यातील अनेक बुरुजांना तडे गेल्याचे दिसत आहे. यामुळे इतिहासप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
धारूर शहर व या परिसराच्या वैभवात भर टाकण्याचे काम येथील ऐतिहासिक किल्ला करतो. १५६८ च्या काळात आदिलशाहचा सरदार किश्वरखान लारी याने बांधलेला हा किल्ला आजही शाबूत व बऱ्याच बाबतीत चांगल्या स्थितीत आहे. पुरातत्त्व विभागाने अनेक वर्षांच्या मागणीनंतर या किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केल्यावर पाच वर्षांपूर्वी दोन टप्प्यांमध्ये या किल्ल्यास ७ कोटी रुपयांचा निधी दिला. या निधीतून किल्ल्याच्या समोरील भागाची डागडुजी करण्यात आली. यामुळे किल्ल्याची शोभा वाढली व किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढली. पर्यटकांची ये-जा वाढल्यानंतर सुरुवातीस या किल्ल्याला खासगी संस्थेमार्फत सुरक्षा गार्डही नेमण्यात आले होते. त्यामुळे किल्ल्याची सुरक्षितता जपली जात होती. मात्र, दोन वर्षांपासून सुरक्षा गार्ड नसल्याने हा किल्ला म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा.. झाला आहे. या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी पुढील निधी न आल्याने किल्ल्याचा मागील भाग व किल्ल्यातील महत्त्वाचे भाग भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या खाऱ्या पाण्याच्या साठ्याकडील अनेक बुरुजांच्या भिंतींना गेलेल्या मोठमोठ्या तड्यांमुळे हे बुरुजही येणाऱ्या काळात भुईसपाट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पुरातत्त्व विभागही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. पुढील बाजूने चकाचक दिसणारा किल्ला मागील बाजूने मात्र भुईसपाट होत असल्याने इतिहासप्रेमी दुःख व्यक्त करीत आहेत. पुढील निधी मिळत नसल्याने या प्रश्नी शासनाला जाग केव्हा येणार? असाही प्रश्न दुर्गप्रेमी विचारत आहेत.
वरिष्ठांच्या सूचनेनुसार पाठपुरावा सुरू
धारूर किल्ल्यातील पुढच्या कामासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. सीएसआर फंडातून एखादी संस्था सुरक्षा रक्षक नेमत असेल तर त्यादृष्टीनेही प्रयत्न करीत आहोत. अत्यावश्यक कामाची पाहणी करून वरिष्ठ कार्यालयास आपण अहवाल नक्की पाठवू, असे पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक अनिल गोटे यांनी सांगितले.
किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव जपावे
धारूर येथील किल्ल्यात ७ कोटी रुपयांचे काम झाल्याने दर्शनीय भाग चांगला झाला. मात्र, पुढील निधी येत नसल्याने पाठीमागील बाजूने किल्ल्यास धोका निर्माण झाला आहे. पुढील काम तत्काळ होणे आवश्यक आहे. किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी पहारेकरी कायमस्वरूपी नियुक्त करून किल्ल्याचे ऐतिहासिक वैभव जपणे आवश्यक आहे, असे अभ्यासक सय्यद शाकेर यांनी सांगितले.