बीडमध्ये तीन विवाहितांचा छळ प्रकरणात सासरच्यांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 18:58 IST2019-01-23T18:57:47+5:302019-01-23T18:58:46+5:30
याप्रकरणी वडवणी, पाटोदा व बीड शहर पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बीडमध्ये तीन विवाहितांचा छळ प्रकरणात सासरच्यांविरोधात गुन्हा
बीड : माहेरहून पैसे आणत नसल्याने तीन विवाहितांचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी वडवणी, पाटोदा व बीड शहर पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याण येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत २० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसीक छळ केला. तसेच उपाशी पोटी ठेवत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात पती सुमित यादवसह इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तर नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत २२ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. त्यानंतर विवाहितेने महिला तक्रार निवारण केंद्रात कैफियत मांडली. मात्र त्यानंतरही काहीच तोडगा निघाला नाही. अखेर विवाहितेच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात पती दत्तात्रय वाघमोडे, मारूती वाघमोडे, उषा वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अगोदर फसवणूक; आता छळ
मुलगा पोलीस असल्याचे सांगून मुलीसोबत विवाह केला. त्यानंतर तो पोलीस नसून खाजगी सुरक्षा रक्षक असल्याचे समोर आले. त्यानुसार आगोदर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. पुन्हा कसा तरी संसार सुरू झाला. चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेचा छळ केला. तु पसंत नाहीस, असे म्हणत विवाहितेला घराबाहेर हाकलुन दिले. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात पुन्हा विवाहितेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विलास मुंडे, वसंत मुंडे, गिरजाबाई मुंडे, सुर्यकांत मुंडे, शाम केकान, नाथा केकान यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.