आजी, माजी नगराध्यक्षासह सहा जणांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:21 AM2017-11-22T00:21:09+5:302017-11-22T00:21:19+5:30
काम न करताच सात लाख ३६ हजारांचा निधी हाडपल्याप्रकरणी केज नगर पंचायतच्या आजी, माजी नगराध्यक्षासह सहा जणांविरूद्ध केज पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. यात मुख्याधिकारी, अभियंत्यांचाही समावेश आहे.
केज (जि. बीड) : काम न करताच सात लाख ३६ हजारांचा निधी हाडपल्याप्रकरणी केज नगर पंचायतच्या आजी, माजी नगराध्यक्षासह सहा जणांविरूद्ध केज पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. यात मुख्याधिकारी, अभियंत्यांचाही समावेश आहे.
केज नगरपंचायती अंतर्गत प्रभाग क्रमांक १२ मधील सिमेंट नाली आणि नखाते यांचे घर ते कच्छी व भागवत गुंड यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी ११ डिसेंबर २०१५ रोजीच्या बैठकीत ७ लाख ८० हजार १११ रूपयांचा निधी मंजूर केला होता. या कामाला प्रशासकीय मान्यताही मिळाली होती.
परंतु सिमेंट रस्ता आणि नालीचे काम न करताच याकामाची बांधकाम अभियंता सुभाष रोकडे यांनी खोटे दस्ताऐवज जोडून मोजमाप पुस्तिकेत त्याची नोंद केली. काम न करताच गुत्तेदार विलास ज्ञानोबा थोरात व इतरांनी ७ लाख ३६ हजार ७८६ रुपयांचा निधी उचलून शासनाची व जनतेची फसवणूक केली, अशी फिर्याद नगरसेविका मालती रामचंद्र गुंड यांनी दिली होती. मात्र पोलीस गुन्हा दाखल करीत नसल्याने त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते.
न्यायालयाच्या दणक्यानंतर गुन्हा दाखल
याप्रकरणी नगरसेविका मालती रामचंद्र गुंड यांनी अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने २५ सप्टेंबर रोजी दिले होते. त्यानुसार सोमवारी रात्री आजी, माजी नगराध्यक्षासह मुख्याधिकारी, गुत्तेदार आणि अभियंता अशा सहा जणांविरूद्ध केज पोलिसांत अपहार आणि लाच लुचपत कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. बीड येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हाणपुडे पाटील याप्रकरणी तपास करीत आहेत.
सहाही आरोपी फरार
मुख्याधिकारी पुष्पगंधा बालासाहेब भगत, गुत्तेदार विलास ज्ञानोबा थोरात, बांधकाम अभियंता सुभाष रोकडे, तत्कालीन नगराध्यक्ष कबीरोद्दीन निसरोद्दीन इनामदार, तत्कालीन उपनगराध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष आदित्य अशोकराव पाटील, नगरसेवक पशुपतीनाथ गणपतराव दांगट या सहा जणांविरूद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आपल्याविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हे सहाही आरोपी फरार झाले. त्यांचा केज पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
---------------