जवानावर अत्याचाराचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:08 AM2019-06-11T00:08:28+5:302019-06-11T00:11:29+5:30
लग्नाचे आमिष दाखवून एका तरूणीवर अत्याचार करणाऱ्या जवानाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : लग्नाचे आमिष दाखवून एका तरूणीवर अत्याचार करणाऱ्या जवानाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या जवानाने सलग दोन वर्षे तरूणीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. बीड शहरातील संत नामदेव नगर भागात ही घटना घडली.
प्रदीप राजाभाऊ मुंडे (२७, रा. वडवणी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संत नामदेव नगर भागात राहणारी पीडित २० वर्षीय तरुणीचे वडवणी येथे नातेवाईक राहतात. त्यामुळे ती नेहमीच वडवणी येथे जात होती. दोन वर्षांपूर्वी ती अशीच एकदा कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे गेली होती. याचवेळी तिची याच गल्लीत राहणा-या प्रदीप मुंडे सोबत ओळख झाली. ओळखीतून त्यांची मैत्री आणि मैत्रीनंतर प्रेम झाले. प्रदीप सुट्टीवर आल्यास ते नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होते. अनेकवेळा तरूणीच्या घरीही प्रदीप राहिला. हा सर्व प्रकार तरूणीच्या आईलाही माहिती होता. मात्र तो तिच्याशी लग्न करणार असल्याने तिनेही त्यांना अडविले नाही. प्रदीप हा सुट्टीवर आला की या तरूणीसोबत रहात असे.
दरम्यान, २८ एप्रिल २०१९ रोजी प्रदीप हा बीडला आला. वडवणीला जाण्याऐवजी तो पीडितेच्या बीडमधील घरी राहिला. यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो पुन्हा कर्तव्यावर गेला. दरम्यानच्या काळात त्याचे एका मुलीसोबत लग्न जुळले. १० जून रोजी त्यांच्या विवाहाची तारीखही निश्चित झाली होती. हाच प्रकार पीडितेला मैत्रीणीमार्फत समजला. तिला हे सर्व असह्य झाले.
आपल्याला धोका झाल्याचे समजताच प्रदीप येण्याच्या दिवशी ती बीड बसस्थानकात जावून बसली. सायंकाळी सहाच्या सुमारास प्रदीप बसमधून उतरताच तिने त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. दोन दिवस त्यांची इथे चौकशी चालली. दोघांनीही आपण लग्न करणार असल्याचा जबाब दिल्याने त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केले. मात्र, नंतर त्याने लग्नास नकार दिल्याने पीडिता सोमवारी सकाळीच ठाण्यात गेली आणि प्रदीपविरोधात अत्याचाराची फिर्याद दिली. त्यावरून अत्याचार व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास उपअधीक्षक भास्कर सावंत करत आहेत.
लग्नादिवशीच पीडित तरुणी ठाण्यात
आठवड्यापूर्वी दोघांनीही आपण लग्न करणार असल्याचा जबाब दिल्याने पोलिसांनी त्यांना सोडले. मात्र प्रदीप नंतर बदलला. त्याने लग्नास नकार दिला. सोमवारी त्याच्या लग्नाची तारीख होती.
याच दिवशी पीडिता ठाण्यात पोहचली आणि त्याच्याविरोधात फिर्याद दिली. दरम्यान, आठवड्यापूर्वीच नियोजीत वधूला हा सर्व प्रकार समजला होता.
त्यामुळे त्यांनी या लग्नास नकार दिला होता. सध्या प्रदीप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.