कोविड सेंटरमधून बाहेर पडलेल्या तीन कोरोनाबाधितांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:04+5:302021-05-05T04:55:04+5:30
वडवणी (जि. बीड) : कोविड केअर सेंटरमधून फळे, पाणी बॉटल घेण्यासाठी बाहेर आलेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णांवर गुन्हा दाखल केला ...
वडवणी (जि. बीड) : कोविड केअर सेंटरमधून फळे, पाणी बॉटल घेण्यासाठी बाहेर आलेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी दुपारी वडवणी येथे घडली. याबाबत आरोग्य विभागाने सोमवारी रात्री फिर्याद दिली आहे.
वडवणी येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका प्रशासनाने तीन कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांंनी तहसीलदार, नगरपंचायत, पंचायत समिती, पोलीस, आरोग्य विभाग यांना कामाची विभागणी करून दिली आहे. मात्र, कोविड सेंटरमध्ये पाणी उपलब्ध नाही, असे कारण देऊन पाण्यासाठी बाहेर पडणे तीन कोरोनाबाधितांना महागात पडले आहे.
शहरातील आनंद मंगल कार्यालयातील कोविड केअर सेंटरमधील उपचारासाठी दाखल असलेल्या तीन रुग्णांनी सोमवारी सेंटरवरील कर्मचाऱ्यांना चकवा दिला. विनामास्क बाजारात फिरून किराणा सामान, फळे, पाणी बॉटल व इतर साहित्य खरेदी करुन परत सेंटरमध्ये दाखल झाले.
या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तहसीलदार वैशाली पाटील यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता या कोविड सेंटरला भेट देऊन बाहेर फिरणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना खडेबोल सुनावले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची सूचना दिली. यावरुन येथील कोविड सेंटरचे आरोग्य अधिकारी दीपक गावडे यांनी सोमवारी रात्री पोलिसात फिर्याद दिली. यावरुन वडवणी पोलिसांनी तीन रुग्णांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आसेफ शेख करीत आहेत.
....
वडवणी शहरातील तिन्ही कोविड केअर सेंटरमध्ये पोलीस कर्मचारी बंदोबस्त दिला आहे. यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.
- जयसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक, वडवणी पोलीस स्टेशन.
...
कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शहरात तीन कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. रुग्णांनी कुठल्याही प्रकारे गैरवर्तन करू नये. काही अडचणी असतील तर वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करावी, प्रशासनाला सहकार्य करावे.
- डाॅ. एम. बी. घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी, वडवणी.
...
कोविड काळात नागरिकांनी जबाबदारीने वागले पाहिजे. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कोरोनाबाबत दिलेल्या नियमांचे, सूचनांचे पालन करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.
- वैशाली पाटील, तहसीलदार, वडवणी.
...