जमावबंदी असताना भांडण करणाऱ्या ५० जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:31+5:302021-04-03T04:30:31+5:30
बीड : कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. तर संचारबंदी व जमावबंदीदेखील लागू आहे. ३१ ...
बीड : कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. तर संचारबंदी व जमावबंदीदेखील लागू आहे. ३१ मार्च रोजी नेकनूरमध्ये दोन गटात जागेच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाली होती. याप्रकरणी साथरोग नियंत्रण कायदा व जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ग्रामसेवकाच्या फिर्यादीवरून ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेकनूर येथील महामार्गालगत असलेल्या एका जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेत काहीजण गंभीर जखमी देखील झाले होते. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते. ही घटना ३१ मार्च रोजी घडली होती. सध्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व दुपारी १ वाजेनंतर संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. मात्र, नेकनूरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारीदरम्यान दोन्ही गटातील ५० जण आमनेसामने आले होते. यामध्ये काहीजण जखमी देखील झाले होते. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल होण्याची शक्यता होती; मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी साथरोगप्रतिबंधक कायदा व जमावबंदी कायद्याच्या माध्यमातून ग्रामसेवक व्यंकट बाबुराव कैलवाड यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद फहाद बाशीद, समद बाशीद, अब्दुल बाशीद, मोहम्मद आहद, सबूर हादी, आदिल खान, मुकसुद पाशा सुबानी पाशा, शफीक अब्दुल रजातक, व इतर ३० ते ४० अशा ५० जणांवर नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि काळे हे करत आहेत.