आष्टीतील ग्रामसेवकांवर होणार फौजदारी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:23 AM2021-07-11T04:23:16+5:302021-07-11T04:23:16+5:30
बीड : होम आयसोलेशन बंद असतानाही आष्टी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण घरीच राहत आहेत. ही बाब निदर्शनास आल्यावर मुख्य कार्यकारी ...
बीड : होम आयसोलेशन बंद असतानाही आष्टी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण घरीच राहत आहेत. ही बाब निदर्शनास आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आष्टीतील सर्वच ग्रामसेवकांना सूचना करून २४ तासांत सर्वांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यास सांगितले होते. परंतु, तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाईची टांगती तलवार आहे. याबाबत सीईओ अजित कुंभार यांनी नाेटीस बजावून खुलासा मागविला आहे.
जिल्ह्यात तालुक्यांतील रुग्णसंख्या कमी होत असतानाही आष्टी तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे. कोरोना नियमांचे पालन न करणे आणि जिल्हास्तरावरून दिलेल्या सूचनांचे कठोर पालन होत नसल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे उघड झाले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी गुरुवारी आष्टी तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. यात त्यांना होम आयसोलेशन बंद असतानाही काही रुग्ण घरातच राहिल्याचे दिसले. यावर त्यांनी सर्वांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले.
दुपारनंतर तालुक्यातील सर्वच ग्रामसेवकांची बैठक घेऊन होम आयसोलेट रुग्णांना २४ तासांच्या आत सीसीसीमध्ये दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी याची उलट तपासणी केली असता ७० पेक्षा जास्त रुग्ण घरीच असल्याचे उघड झाले. यावर सीईओंनी आष्टी तालुक्यातील सर्वच ग्रामसेवकांना नोटीस बजावून फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. दोन दिवसांत खुलासा सादर करण्यासाठी वेळ दिला आहे. यामुळे ग्रामसेवकांचे धाबे दणाणले असून सर्वच कामाला लागल्याचे समजते.
बीडीओंकडूनही नोटीस
आष्टीचे गटविकास अधिकारी यांनीही सर्वच ग्रामसेवकांना वैयक्तिक नोटीस बजावत असल्याचे सूत्रांकडून समजते. तर दुसऱ्या बाजूला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार हे तीन दिवसांपासून आष्टी तालुक्यावर लक्ष ठेवून आहेत. तसेच शनिवारीही ते आष्टीत तळ ठोकून होते.