'राजस्थानी मल्टीस्टेटच्या चेअरमन, संचालक मंडळावर गुन्हे दाखल करा'; परळीत ठेवीदार आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 03:57 PM2024-05-18T15:57:38+5:302024-05-18T15:58:00+5:30
लातूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य शाखा कार्यालय केले सिल
- संजय खाकरे
परळी: येथील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी परळी येथील ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने आज शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. फसवणूक प्रकरणी 25 एप्रिल रोजी दाखल केलेल्या तक्रारी अर्जावरून संचालक मंडळावर कारवाई करावी असा आग्रह ठेवीदारांनी धरला आहे.
येथील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन चंदुलाल बियाणी व संचालक मंडळांनी मुदतीनंतर ही ठेवीदारांचे पैसे परत केले नाहीत . गेल्या आठ महिन्यापासून राजस्थानी मल्टीस्टेटच्या परळीतील पाच शाखा बंद आहेत व चेअरमन चंदुलाल बियाणी व संचालक मंडळ गायब झाले आहे. त्यांचा मोबाईल ही बंद येत आहे.त्यामुळे ठेवीदारांनी येथील तहसील कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी उपोषण केले तसेच राजस्थानी मल्टीस्टेटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु अद्यापही ठेवीदारांना पैसे मिळाले नसल्याने ठेविदार संतप्त झाले आहेत.
शनिवारी राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालका विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी परळीचे पोलीस निरीक्षकाकडे केली आहे. शुक्रवारी लातूर येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी राजस्थानी मल्टीस्टेटच्या मोंढा भागातील मुख्य शाखेला सिल ठोकले आहे. तसेच अरुणोदय मार्केटमधील शाखेला भेट दिली आहे अशी माहिती ठेवीदार सेवकराम जाधव यांनी शनिवारी दिली. लातूर पोलीस ठाण्यातही लातूर येथील एका ठेवीदारांनी संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार दाखल केल्यावरून गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी लातूर आर्थिक शाखेचे पोलीस परळीत येऊन गेले. दरम्यान, आज सकाळी परळी येतील ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालक मंडळ विरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार ससाणे यांची भेट घेतली.
तपास करू
या प्रकरणाचा तपास करून संचालकाविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येईल.
- राजकुमार ससाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, परळी
अनेक ठेवीदार अडचणीत
विश्वासाने पैसे गुंतवले असून मुदतीनंतरही पैसे परत मिळाले नाहीत. चेअरमन व संचालक भेटत नाहीत ते परळीतून निघून गेले आहेत. त्यामुळे दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न पडला आहे. अनेक ठेवीदारांना विविध आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.
- रमेश कोमवार, ठेवीदार, परळी