बीडमध्ये पोलिसावर हल्ला करून पाकिटमाराचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 05:49 PM2019-01-01T17:49:47+5:302019-01-01T17:54:29+5:30
आरोपीने पोलिसांवर तीनवेळा केला हल्ला
बीड : सहायक फौजदाराच्या हाताला चावा आणि नाकावर बुक्की मारून एका पाकिटमाराने पलायन केले. ही घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास बीड बस्थानकात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पाकिटमार अद्यापही फरारच आहे. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
राधेश्याम बन्सीधर आमटे (३७, रा. पालवण चौकाजवळ, बीड) असे पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगर ठाण्याचे सहायक फौजदार गौतम मोहन जाधव हे बसस्थानकातील चौकीत कार्यरत आहेत. सोमवारी रात्री साडेआठ वाजता ड्यूटी संपवून ते घरी निघाले होते. एवढ्यात निवृत्ती बापूराव डाखळे (रा. कोल्हापूर) हे प्रवासी त्यांच्याकडे धावत आले. कोल्हापूर बसमध्ये चढत असताना चोरांनी खिसा कापून पाकीट लांबविल्याचे त्याने जाधव यांना सांगितले. जाधव यांनी तात्काळ बसकडे धाव घेतली.
यावेळी त्यांना राधेश्याम हा अंधारातून पळताना दिसला. त्यांनी पाठलाग करून त्याला पकडले. पोलिसाने पकडल्याचे समजताच त्याने हिसका मारून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र अयशस्वी ठरला. त्याने राधेश्यामने जाधव यांच्या डाव्या हाताला चावा घेतला. त्यानंतर नाकावर बुक्की मारून अंधाराचा फायदा घेऊन त्याने पलायन केले. जाधव यांना इतर लोकांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. जाधव यांच्या फिर्यादीवरून राधेश्याम आमटेविरोधात शासकीय कामात अडथळा व हल्ला केला म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक बी.एस.ढगारे हे करीत आहेत.
पोलिसांवर तीनवेळा केला हल्ला
साधारण तीन वर्षांपूर्वी बीड ग्रामीण ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर राधेश्यामने हल्ला केला होता. यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याचा एक डोळा निकामी झाला होता. त्यानंतर साधारण दोन महिन्यांपूर्वी आण्णा भाऊ साठे चौकात वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यासह भर चौकात मारहाण केली होती. तसेच शिवीगाळही केली होती. एवढेच नव्हे तर त्याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. तर सोमवारी रात्री सहायक फौजदारावर हल्ला केला. ही कारकिर्द पाहून राधेश्याम हा पोलिसांना टार्गेट करीत असल्याचे स्पष्ट होते.
मुलांना मारल्याप्रकरणी पत्नीही कारागृहात
राधेश्याम हा रिक्षाचालक म्हणून काम करतो. तसेच त्याची पार्श्वभूमि गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याच्या पत्नीने आपल्या पोटच्या दोन मुलांना हौदात बुडवून ठार मारले होते. ३० आॅक्टोबर रोजी ही घटना घडली होती. तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सध्या तीही कारागृहात असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.
तपास सुरु आहे
गुन्हा दाखल झाला आहे. त्याला तात्काळ अटक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापुर्वी त्याच्यावर दाखल गुन्ह्यांचीही माहिती घेतली जात आहे. तपास केल्यानंतरच आणखी माहिती समजेल.
- बी.एस.ढगारे, पोलीस उपनिरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड