पीक विमा भरताना बनवाबनवी सुरूच; केवळ तीन शेतकऱ्यांनी भरला २७९२ एकरचा विमा

By शिरीष शिंदे | Published: September 9, 2023 07:14 PM2023-09-09T19:14:39+5:302023-09-09T19:15:34+5:30

बीड जिल्ह्यातील १८० अतिरिक्त विमा भरणारे रडारावर

Crop Insurance Scam; Only three farmers paid insurance for 2792 acres | पीक विमा भरताना बनवाबनवी सुरूच; केवळ तीन शेतकऱ्यांनी भरला २७९२ एकरचा विमा

पीक विमा भरताना बनवाबनवी सुरूच; केवळ तीन शेतकऱ्यांनी भरला २७९२ एकरचा विमा

googlenewsNext

बीड : जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याची भारतीय कृषी विमा कंपनीने तपासणी सुरू केली आहे. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी अकृषिक जमिनीवर तब्बल २ हजार ७९२ एकरचा पीक विमा काढून क्षेत्र संरक्षित केले आहे. तर जिल्ह्यातील जवळपास १८० शेतकऱ्यांनी ६१ एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर अधिक विमा भरला आहे.

जिल्ह्यातील काही भागात काही ठिकाणी अतिरिक्त पीक विमा भरण्याची बाब भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर रिमोट सेन्सिंगचा आधार घेत ग्राऊंड ट्रुथिंग करण्याचे आदेश दिले होते. १५ दिवसांच्या कालावधीत विमा कंपनीने केलेल्या तपासणीत अतिरिक्त पीक विमा भरून त्याचे पैसे लाटण्याच्या उद्देशाने विमा भरल्याचे दिसून येत आहे.

अतिरिक्त विम्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या
शेतकऱ्यांनी पीक विमा भरताना सातबाऱ्यावर पिकाच्या नमूद क्षेत्रापैकी अधिक क्षेत्र दाखवून विमा भरला आहे. कमी जमीन असताना जास्त जमीन व त्यावर लावण्यात आलेल्या पिकांचे क्षेत्र अधिक दाखवून पीक विमा भरण्यात आला आहे. अतिरिक्त विम्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरण्यात आल्या आहेत.

घोटाळ्यात सीएससी चालक सहभागी?
पीक विमा घोटाळ्यात सीएससी चालक सहभागी असल्याचा संशय विमा अधिकाऱ्यांना आहे. परभणी जिल्ह्यातील एका सीएससी चालकाने वडवणी तालुक्यातील एका गावातील पीक विमा भरला आहे. विमा अर्ज भरल्यानंतर व्हेरिफिकेशनच्या वेळी नेट बंद करणे, वेगवेगळे प्रकार हॅकिंग करणे असे प्रयोग केले आहेत. पीक विमा अर्ज भरताना सातबाऱ्याची पडताळणी होते, शेवटी यादीमध्ये पंच होते. परंतु अयोग्य पद्धतीने भरलेले फॉर्म पूर्णत: भरले गेले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत समोर आलेली प्रकरणे
अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील तीन शेतकऱ्यांनी अकृषिक जमिनीवर अतिरिक्त विमा भरला आहे. एका शेतकऱ्याने सोयाबीनसाठी ४५८ हेक्टर, दुसऱ्या शेतकऱ्याने २१२ हेक्टर तर तिसऱ्या शेतकऱ्याने ४५९ हेक्टर असा एकूण १,१३० हेक्टर म्हणजेच २,७९२ एकरचा विमा काढला आहे. या तिन्ही शेतकऱ्यांनी सदरील पीक विमा रद्द करण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे. नजरचुकीने अकृषिक जमिनीवर विमा भरला असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे.

१८० शेतकऱ्यांनी भरला अतिरिक्त विमा
जिल्ह्यातील जवळपास १८० शेतकऱ्यांनी २५ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर विमा भरला आहे. त्यांच्याकडे एवढी शेती नसतानाही केवळ विमाच काढला नाही तर अतिरिक्त विमा भरून विम्याचा लाभ घेण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु विमा कंपनीच्या वेळीच लक्षात आल्याने अतिरिक्त विमा घोटाळा प्रकरण समोर आले आहे.

पीक विमा रॅकेट सक्रिय
जिल्ह्यात पीक विम्याचा धंदा करण्याची माफियागिरी सुरू झाली असून हे माफिया सक्रिय झाले आहेत. मागच्या वर्षी पीक विमा कंपनीने अतिरिक्त पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार होते; परंतु विमा भरणारे शेतकरी असल्याच्या भावनेतून कारवाई झाली नव्हती; परंतु आता पुन्हा असेच प्रकरण समोर आले आहे. काही मोजक्या लोकांमुळे खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो. परिणामी पीक विमा कंपनी या घोटाळेबाज शेतकऱ्यांचा हवाला देत संबंधित मंडळातील सर्वच शेतकऱ्यांची नुकसानभरपाई रोखून धरते. अतिरिक्त पीक विमा भरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Crop Insurance Scam; Only three farmers paid insurance for 2792 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.