पावसामुळे डाेळ्यादेखत पिकांचे नुकसान, तीन एकरातील उडीद भिजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:11 AM2021-09-02T05:11:45+5:302021-09-02T05:11:45+5:30
आष्टी : पावसामुळे डोळ्यांदेखत पिकांचे नुकसान होताना पाहण्याचे दुर्भाग्य आमच्या नशिबी आले. माझी कऱ्हेवडगांव शिवारात जमीन असून मागील ...
आष्टी : पावसामुळे डोळ्यांदेखत पिकांचे नुकसान होताना पाहण्याचे दुर्भाग्य आमच्या नशिबी आले. माझी कऱ्हेवडगांव शिवारात जमीन असून मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पीके धोक्यात सापडली आहेत. पावसामुळे काढणीला आलेल्या उडीद पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संपूर्ण उडीद पाण्यात आहे. अगोदर संततधार पाऊस ३ ते ४ दिवसांपासून पडत असल्याने उभे उडीद पीक कोमेजले. आता रात्रीपासून अचानक जोरदार पाऊस कोसळल्याने काढलेल्या ३ एकर शेतातील उडीद पूर्णपणे भिजले आहेत. या पावसाने २ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असून शासनाने आमच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कऱ्हेवडगांव येथील भगवानराव सांगळे या शेतकऱ्याने केली. तर सावरगाव व मच्छिंद्रनाथ गड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे उडीद, कापूस, साेयाबीन, कांडे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी सावरगाव येथील शेतकरी सोमनाथ क्षीरसागर यांनी केली.
तालुक्यात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी विविध भागात जोरदार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मच्छिंद्रगड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असून काही ठिकाणी रस्तेही वाहून गेले आहेत.नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर उडीद, बाजरी, मूग, सोयाबीन या पिकांची काढणी सुरू असून ते भिजून मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
310821\img-20210831-wa0295_14.jpg