पावसा अभावी पिके करपली; पंचनामे करण्याच्या मागणीसाठी शेतकर्यांचे आडस येथे रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:19 PM2018-08-10T18:19:06+5:302018-08-10T18:24:59+5:30
अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. या मागणीसाठी आडस येथील शिवाजी महाराज चौकात रास्तारोको केले.
केज (बीड ) : तालुक्यातील होळ महसूल मंडळात अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. खरीपाच्या पिकांची पाहणी करून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत. या मागणीसाठी आडस येथील शिवाजी महाराज चौकात आज सकाळी साडेनऊ वाजता शेतकऱ्यांनी रास्तारोको केले.
तालुक्यातील होळ महसूल मंडळात पर्जन्यमान कमी झाल्याने टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. थोड्याफार पडलेल्या पावसावर कशाबश्या खरीपाच्या पेरण्या करण्यात आल्या. मात्र पेरणीनंतर एक महिना संपला तरी पाऊस न पडल्याने या भागातील खरीपाची कापुस, सोयाबीन, तूर, मूग, बाजरी व मका ही कोवळी पिक पावसाअभावी करपली आहेत, तर कांही पिकांची वाढ खुंटली आहे. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाऊस नसल्याने पाणी पातळी खोल गेल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे परीसरातील शेतकर्यांनी बैलगाड्या रस्त्यावर सोडून आज आडस येथील शिवाजी महाराज चौकात सकाळी एक तास रास्तारोको आंदोलन केले.
शेतकर्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार नायब तहसीलदार एन.एम. शेख यांना देऊन रास्तारोको आंदोलन मागे घेतले. आंदोलनात रमेश आडसकर, राम माने, सरपंच बालासाहेब ढोले, उपसरपंच ओमकार आकुसकर, शिवरूद्र आकुसकर, बाळासाहेब देशमुख, राजेभाऊ पत्रवाळे, विकास काशिद, रमेश ढोले, गफार पठाण, शिवाजी खडके, शाम गंगात्रे यांच्यासह परीसरात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.