वीज नसल्याने पिके धोक्यात, संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 11:39 AM2022-11-14T11:39:38+5:302022-11-14T11:53:13+5:30
शेतात सध्या गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांना पाण्याची गरज आहे.
- नितीन कांबळे
कडा (बीड) : टाकळी अमिया, सराटेवडगांव, निमगांव चोभा, रूई नालकोल, नांदा या गावांत गेल्या पाच दिवसांपासून अचानक विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पिके धोक्यात आल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी या गावांतील संतप्त शेतकर्यांनी आज सकाळी टाकळी अमिया येथील ३३ केव्ही सबस्टेशन येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत निषेध व्यक्त केला.
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील ३३ के.व्ही. सबस्टेशनमधून परिसरातील गावांना विद्युत पुरवठा केला जातो. परंतु गेल्या पाच दिवसांपासून महावितरणने अचानक टाकळी अमिया, सराटेवडगांव, निमगांव चोभा, रूई नालकोल, नांदा या गावांतील विद्युत पुरवठा खंडित केला आहे. शेतात सध्या गहू, ज्वारी, हरभरा, कांदा या पिकांना पाण्याची गरज आहे. असे असताना वीज नसल्याने पिके धोक्यात आल्याचे पाहून शेतकरी जेरीस आला आहे. यामुळे परिसरातील संप्तत शेतकऱ्यांनी आज सकाळी टाकळी अमिया येथील सबस्टेशनला घेराव घालत महावितरणच्या अभियंत्याना धारेवर धरत निषेध व्यक्त केला. आंदोलनात ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. राम बोडखे, डाॅ.शिवाजी शेंडगे, अमोल शितोळे, पिनु चौधरी,सावता ससाणे, मधुकर गिर्हे, अशोक चौधरी, अशोक एकशिंगे, श्रीरंग चौधरी, तात्यासाहेब नालकोल, आजिनाथ नालकोल, पांडुरंग धोंडे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते.
थकीत बिलामुळे वीजपुरवठा खंडित
याबाबत कडा येथील महावितरणचे सहायक अभियंता दत्तात्रय दसपुते यांनी सांगितले की, या परिसरात थकीत वीजबिलाचा आकडा मोठा आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून सबस्टेशनमधून होणार विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
आमचंच खाता आमच्यावर उलटता
आता मुबलक पाणी आहे, पेरण्या झाल्या, काही शिल्लक आहेत. पिकाला पाण्याची गरज असताना वीज बंद केली. साहेब आमचचं खाता आणि आमच्यावर उलटता हे बर नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी शिवाजी भवर यांनी यावेळी दिली.