पिके अजूनही पाण्यात, काढणी खर्च काढायचा तरी कसा...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 11:37 PM2019-11-04T23:37:06+5:302019-11-04T23:37:39+5:30
सलग दोन वर्षे दुष्काळाची गेली. खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे कसाबसा पार पडेल असे वाटले होते. पण परतीच्या पावसाने जे हाती आले तेही गमावावे लागले.
अविनाश मुडेगावकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : सलग दोन वर्षे दुष्काळाची गेली. खरिपाचा हंगाम अपुऱ्या पावसामुळे कसाबसा पार पडेल असे वाटले होते. पण परतीच्या पावसाने जे हाती आले तेही गमावावे लागले. होत्याचं नव्हतं झालं साहेब. माझ्या तीन एकर सोयाबीनमध्ये पाणी शिरले आहे. आता हे सोयाबीन काढायचे म्हणले तर प्रति बॅग एकरी ४ हजार रुपये खर्च येतो. केवळ काढणीसाठी १२ हजार रुपये लागतात. पुन्हा उगवलेले तण नष्ट करण्यासाठीचा खर्च वेगळा. अशा स्थितीत उत्पादन तर काहीच नाही. खर्च कसा काढायचा, अशी व्यथा पूस येथील शेतकरी त्रिंबक ज्ञानोबा कचरे यांनी मांडली. दरम्यान तालुक्यातील पूस शिवारात शेती करणारे प्रकाश चोरमले यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे अडीच एकरातील सोयाबीनचे पीक हातचे गेले. कौटुंबिक अडचणींसह मुलीच्या लग्नाबाबत ते चिंतेत होते.
अंबाजोगाई तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रस्तुत प्रतिनिधीने पूस येथे जाऊन पाहणी केली. सोयाबीनचा मोठा पेरा असणाºया या परिसरात आभाळच फाटल्याचे निदर्शनास आले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीपाणी झाले. अनेकांच्या सोयाबीनमध्ये पाणी घुसले. पिके पाण्यावर तरंगू लागली. काढून ठेवलेली बाजरी व पिवळ्याच्या ढिगाºयाला आता कोंबे फुटली आहेत. पाऊस उघडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक उन्हात वाळवायला ठेवले. मात्र, पुन्हा पाऊस आल्याने आहे ते ढिगारेही भिजून कुजून जाऊ लागले आहेत. सोमवारी तिसºया दिवशीही अनेक शेतकºयांच्या शेतामध्ये पाणी तसेच होते. सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसले. आता हे सोयाबीन काढायचे कसे? हा मोठा प्रश्न भेडसावू लागल्याचे नरसिंग जोशी यांनी सांगितले. परिसरातील शेतांमध्ये लावलेला कापूसही भिजला. कापसाच्या आलेल्या बोंडात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने ही बोंडे फुगून त्या आतील कापसाच्या वाती झाल्याचे सांगताना महेश गौरशेटे भावनिक झाले.
तालुक्यात ३० हजार शेतकºयांनी नुकसान भरपाई संदर्भात अर्ज दाखल केल्याचे तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी लोकमतला सांगितले. पाऊस पडून तीन दिवस झाल्यानंतर सोमवारी पूस येथील तलाठी गावात पीकपाहणी व पंचनाम्यासाठी हजर झाले होते. तलाठ्यांना गराडा घालून आमची पाहणी करा अशी मागणी करत शेतकºयांनी एकच गर्दी केली होती.