अतिवृष्टीने पिके पाण्यात, शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:13+5:302021-09-25T04:36:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : केज, अंबाजोगाई तालुक्यात गुरुवारी (दि. २३) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : केज, अंबाजोगाई तालुक्यात गुरुवारी (दि. २३) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे. यात पिकांचे अतोनात नुकसान आहे. यामुळे बीड जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांचे शेतजमीन, शेतीपिकांचे नुकसान झाल्यामुळे प्रती हेक्टर ५० हजार रुपये शासनाने सरसकट मदत करावी, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
आमदार मुंदडा यांनी शुक्रवारी सकाळपासूनच केज, अंबाजोगाई तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानीचा विस्ताराने आढावा घेतला. केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यात पिकांचे १०० टक्के नुकसान नुकसान झाल्यामुळे १०० टक्के विमा रक्कम देण्याबाबत विमा कंपनीस आदेश द्यावेत. राज्यमार्ग, वस्ती रस्ते, शेती रस्ते, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, पाणंद रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा. घरांची पडझड झाली आहे. त्याबाबत तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी आ. मुंदडा यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.