आरटीओ कार्यालयात लायसन्स काढणाऱ्यांची गर्दी; लायसन्स बाद होण्याची भीती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:37 AM2021-09-22T04:37:53+5:302021-09-22T04:37:53+5:30
अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : मुदत संपलेले लर्निंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र तसेच वाहनांच्या पासिंगसह इतर कामांसाठी कोरोनाकाळात ...
अविनाश मुडेगावकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : मुदत संपलेले लर्निंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र तसेच वाहनांच्या पासिंगसह इतर कामांसाठी कोरोनाकाळात शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती; मात्र अंबाजोगाई आरटीओ कार्यालयात २७ व २८ सप्टेंबरपर्यंतच अपॉईंटमेंट घेतलेल्या उमेदवारांना लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काहींची मुदत ३० सप्टेंबर असल्याने लायसन्स बाद होण्याची भीती सतावत आहे. कायमस्वरुपी लायसन्सकरिता रोज २०० तर लर्निंगसाठी १०० जणांना आरटीओत ऑनलाईन अपॉईंटमेंट देण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी दिली.
...
तारीख मिळवूनही उमेदवार येत नाहीत
ज्या उमेदवारांना कायमस्वरुपी लायसन्स काढायचे आहे, अशांना तारीख देण्यात येते. मात्र, त्या तारखेस हमखास आठ ते दहा उमेदवार येतच नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इतर अनेक जण आरटीओशी संपर्क साधतात, मात्र त्यांना ऑनलाईन तारीख मिळत आहे. अनेकांनी आपल्या लायसन्सचे नूतनीकरणही केलेले आहे.
...
रोजचा कोटा १००
पर्मनन्ट लायसन्स मिळविण्याकरिता रोजचा कोटा हा आरटीओत २०० एवढा आहे. त्यानुसारच ऑनलाईन अपॉईंटमेंट देण्यात येते. फिटनेस प्रमाणपत्राकरिता काही कोटा नसतो. ज्याची मुदत संपली आहे. अशी वाहने आरटीओत दाखल होतात, एका मोटर वाहन निरीक्षकांना रोज १५ ते २० वाहने तपासण्याची जबाबदारी देण्यात येते, असे उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांनी सांगितले.
...
लायसन्स नव्याने काढावे लागणार की काय?
लर्निंग लायसन्स काढले आहे. आठ दिवसातच अपॉईंटमेंट मिळाली. आता लवकरच कायमस्वरूपी लायसन्स काढावे लागणार. मुलाचे लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात आलो.
-सुनील पाटील, माजलगाव.
....
माझ्या लायसन्सची मुदत संपत आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयाकडे येऊ शकलो नाही. ऑनलाईन प्रक्रिया ही सुरूच आहे; मात्र स्वतः येऊन प्रक्रिया पूर्ण केली. कसलीही अडचण आली नाही.
-अक्षय जाधव, अंबाजोगाई.
...
काय आहेत अडचणी ?
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने कोरोनाकाळात आदेश काढून ज्यांनी लर्निंग लायसन्स काढले, पण कोरोनामुळे आरटीओत येऊ शकले नाही. अशांना कायमस्वरुपी लायसन्स काढण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली होती. आता ती मुदत संपत असल्याने उमेदवारांनी आरटीओ कार्यालयात धाव घेतली आहे. मात्र, अंबाजोगाईत कोटा फुल्ल झाला नसून त्यांना अपॉईंटमेंट देण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी कुठलीही अडचण नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
...
आढावा घेऊन कोटा वाढविण्यावर निर्णय घेणार
मुदत संपलेल्या लर्निंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, तसेच वाहनांची पासिंग यासाठी शासनाने ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे, परंतु, त्यानंतरही काहींना जर अपॉईंटमेन्ट मिळत नसेल तर आढावा घेऊन कोटा वाढविण्यावर निर्णय घेण्यात येईल.
- दत्तात्रय सांगोलकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अंबाजोगाई.
...