बसमध्ये प्रवाशांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:22+5:302021-03-20T04:32:22+5:30
फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अंबाजोगाई तालुक्यात दररोज निघणारी ...
फिजिकल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अंबाजोगाई तालुक्यात दररोज निघणारी रुग्णसंख्या पन्नास ते साठच्या घरात निघू लागली आहे. अशी स्थिती निर्माण झालेली असतांनाही शहरवासीयांकडून फिजिकल डिस्टन्सबाबत कसलेही गांभीर्य बाळगले जात नाही. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्स पाळावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी केले आहे.
मजुरी महागली
अंबाजोगाई : सध्या शेतीमध्ये हरभरा, गहू, ज्वारी, करडई या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे गावोगावातील मजूर काढणीच्या कामात गुंतले आहेत. सर्व शेतकऱ्यांची काढणी मळणी एकाचवेळी सुरू झाली आहे. त्यामुळे मजूर मिळणे मोठ्या मुश्किलीचे काम झाले आहे. मागणी वाढल्याने अनेक मजुरांनी आपली मजुरीही मोठ्या प्रमाणात वाढवून घेतली आहे. वाढत्या मजुरीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे.
दर वाढूनही सोयोबीनची आवक घटली
अंबाजोगाई : अंबाजोागईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला पाच हजारांपेक्षा जास्त भाव मिळू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दर मिळाला. सोयाबीनचे दर वाढले असले तरी बाजारात सोयाबीनची आवक पाहिजे त्या प्रमाणात राहिली नाही. अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या भाववाढीची अपेक्षा आहे.
उसाची वाहतूक धोकादायक
अंबाजोगाई- अंबाजोगाई तालुक्यातील ऊस. अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, रांजणी येथील साई शुगर, रेणा सहकारी साखर कारखाना, अशा विविध कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस विविध वाहनांद्वारे जात आहे. प्रामुख्याने ऊसाची वाहतूक ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात होते. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरचालक आपले वाहन रस्त्याच्या बाजूलाच लावत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. परिणामी यामुळे लहान मोठ्या अपघातातही मोठी वाढ झाली आहे.