गोपीनाथ गडावर अभिवादानासाठी अलोट गर्दी; ढोक महाराजांच्या कीर्तनाने स्मृती समारंभ सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 12:57 PM2022-06-03T12:57:30+5:302022-06-03T12:57:56+5:30
''गोपीनाथराव वारकऱ्यांना ते वारकरी दिसत, साधकाला ते माय बाप तर अनाथला ते नाथ दिसत''
- संजय खाकरे
परळी (बीड) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी वारकऱ्यांवर प्रेम केले आहे , गोपीनाथराव मुंडे जाऊन 8 वर्ष झाले तरी विश्वास बसत नाही, गोपीनाथराव मुंडे हे अनाथाचे नाथ होते, असे भावोद्गार हभप रामनाचार्य रामराव ढोक महाराज यांनी व्यक्त केले. तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कीर्तन समारंभात ते बोलत होते.
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच गोपीनाथ गडावर अलोट गर्दी झाली आहे. स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभाची सुरुवात रामायणाचार्य ढोक महाराज यांच्या कीर्तनाने झाली. ढोक महाराज पुढे म्हणाले, गोपीनाथराव मुंडे आपल्या नसले तरी माजीमंत्री पंकजा व खासदार प्रीतम मुंडे यांच्या स्वरूपात ते कायम दिसतात. पंकजा मुंडे या झाशीच्या राणी सारख्या आहेत असे ही ढोक महाराज म्हणाले.
सुर्योदय व सुर्यास्त या नैसर्गिक घटना सारखे प्रत्येकाचे जीवन मरण ठरलेले आहे. मात्र, गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे आहे. गोपीनाथराव वारकऱ्यांना ते वारकरी दिसत, साधकाला ते माय बाप तर अनाथला ते नाथ दिसत होते, अशा शब्दात ढोक महाराज यांनी स्व. मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमास प्रज्ञा मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, प्रा. टी. पी मुंडे, फुलचंद कराड, राजेश देशमुख, नीलकंठ चाटे, विनायक गुट्टे, प्रकाश महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.
दुपारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण येणार
दरम्यान, गोपीनाथ गडावर अभिवादानासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण येणार आहेत. दुपारी त्यांच्या उपस्थितीत संघर्ष दिन सन्मान कार्यक्रम होईल.