खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:22+5:302021-06-06T04:25:22+5:30

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या आठवड्यापासून दररोज पाऊस सुरूच आहे. प्रारंभीच्या काळातच समाधानकारक पाऊस पडल्याने पेरणीची तयारी सुरू झाली ...

Crowds to buy fertilizers, seeds | खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी

खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी

Next

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या आठवड्यापासून दररोज पाऊस सुरूच आहे. प्रारंभीच्या काळातच समाधानकारक पाऊस पडल्याने पेरणीची तयारी सुरू झाली आहे. तालुक्यातील शेतकरी बियाणे, रासायनिक खते व विविध प्रकारची शेतीची औजारे खरेदी करण्यासाठी मोंढ्यात गर्दी करू लागले आहेत.

व्यावसायिक अडचणीत

अंबाजोगाई : गेल्या दीड वर्षापासून लग्नसराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्यात जमा आहे. याशिवाय लॉजिंगही बंद आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने वसतिगृहेही ओस पडली आहेत. परिणामी, गाद्यांची मागणी कमालीची घटली असून, गादी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या गादी व्यावसायिकांना कुटुंबाचा चरितार्थ चालवणे अवघड झाल्याने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल पेडगावकर यांनी केली आहे.

धूम्रपानामुळे आजार

अंबाजोगाई : आहाराच्या बदलत्या सवयी, अमली पदार्थाचे मोठ्या प्रमाणात केले जाणारे सेवन, मद्यपान, धूम्रपानामुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून वातावरणातील बदलामुळे खाजगी रुग्णालयांमध्येही गर्दी वाढू लागली आहे. धूम्रपानावर बंदी असतानाही धूम्रपान करणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. अशा प्रकारावर निर्बंध घालावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर देशपांडे यांनी केली आहे.

कर्जवसुली थांबवा

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ बंद आहे. सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यांतील महिला बचत गटांना बँकांनी दिलेली कर्जवसुली काही काळ थांबविण्यात यावी. या कालावधीतील व्याजही रद्द करावे, अशी मागणी नगरसेवक संतोष शिनगारे यांनी केली आहे.

ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांची दैना

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील विविध उपनगरांमध्ये अनेक बांधकामे सुरू आहेत. यासाठी खडी, वीट, वाळू, घेऊन येणाऱ्या ओव्हरलोड टिप्पर, ट्रॅक्टरमुळे रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे, तसेच या वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश दहातोंडे यांनी केली आहे.

Web Title: Crowds to buy fertilizers, seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.