प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:56 AM2019-08-19T00:56:39+5:302019-08-19T00:56:43+5:30
देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी रविवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. १९ आॅगस्ट रोजी तिसरा श्रावण सोमवार असल्याने रविवारपासूनच राज्य व परराज्यातून हजारो भाविक दशर्नासाठी परळीत दाखल झाले आहेत.
तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची अधिक गर्दी होणार असल्याने मंदिर प्रशासनाने विशेष काळजी घेतल्याचे मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली. रविवारी ही भाविकांची रीघ होती. दुपारी ही गर्दी वाढत गेली. दिवसभर हर हर महादेवचा जयघोष चालू होता. मंदिर परिसरात प्रसाद साहित्य, खेळणीची दुकाने थाटलेली आहेत. येथे खरेदीसाठी भाविकांची गर्दी होती. त्यामुळे मंदिर परिसर गजबजून जात आहे. तिसरा श्रावण सोमवार असल्याने शिवमूठ मूग आहे. महिला भाविक मूग अर्पण करतील. मंदिराच्या वतीने महिला- पुरुष व पासधारकांची वेगळी रांग लावण्यात येणार आहे. त्याची तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी असतेच परंतु रविवारी सुटीचा वार असल्याने भक्तांची संख्या वाढली आहे. परंतु याकडे पोलिसांनी लक्ष दिले नाही त्यामुळे मंदिरासमोर वाहतुकीची समस्या उद्भवली होती. रविवारी रात्रीनंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. मंदिरासाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस निरीक्षक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते अशोक जगदाळे यांनी तुळजापूरच्या १५ हजार भाविकांना वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मोफत येण्या जाण्याची व जेवणाची सुविधा केली आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात पाच भक्त निवास असून संत गुरुलिंग स्वामी मंदिर, वक्रेश्वर मंदिर येथेही राहण्याची सोय आहे. या ठिकाणी माफक दर आकारला जातो. तसेच सदाशिव अन्नक्षेत्र असून येथे बाराही महिने बाहेरगावच्या यात्रेंकरुसाठी दोन वेळा मोफत भोजन प्रसाद आहे. सर्व भाविकांसाठी सकाळी खिचडी प्रसाद आहे. शनी मंदिराजवळ अन्नपूर्णा ट्रस्टने श्रावण महिन्यात दोन वेळचे मोफत भोजनाची सोय केली आहे. मंदिरासमोर पार्किंगची सोय आहे. श्रावण सोमवारी तळाजवळ पार्किंगची सोय केली आहे.