लॉकडाऊनमुळे बाजारात खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:34 AM2021-03-26T04:34:07+5:302021-03-26T04:34:07+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी २५ मार्चच्या रात्री बारा वाजेपासून लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर बुधवार आणि ...
बीड : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी २५ मार्चच्या रात्री बारा वाजेपासून लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर बुधवार आणि गुरुवारी शहरातील बाजारपेठेत खरेदी व इतर कामांसाठी नागरिकांनी गर्दी केली होती, तर शहरातील सर्वच रस्त्यांवर वातूक मोठ्या प्रमाणात सुरू होती. त्यामुळे वर्दळीच्या भागात वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, दहा दिवसांचा लॉकडाऊन प्रशासनाने रद्द करावा, अशी मागणी जिल्हाभरातील व्यापारी संघटनांसह राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यांतर पुढी दहा दिवसांच्या अनुषंगाने लागणाऱ्या किराणा खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांवर गर्दी केली. लॉकडाऊन आणि प्रतिबंधामुळे ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांसह शहरातील नागरिक खरेदीसाठी आल्याने जुना मोंढा भागात रहदारीची कोंडी झाली. लॉकडाऊनच्या निर्णयामुळे सुस्तावलेल्या किराणा बाजारात दोन दिवस मोठी वर्दळ होती. गुरुवारी शहरातील भाजी मंडईत सकाळपासूनच गर्दी दिसून आली. लॉकडाऊनमुळे मिळेल त्या भावात शेतकऱ्यांनी भाज्या विकल्या. बुंदेलपुरा, मंडईसह सार्वजनिक वाचनालयाच्या रस्त्यावर तसेच जालना रोडपर्यंत शेतकरी आणि विक्रेते भाजी विकण्यासाठी बसले होते. राजीव गांधी चौक भागातही विक्रेते मोठ्या संख्येने दिसून आले. ग्राहकांनीही खरेदी केली. फळांच्या बाजारात मोसंबीचा तुटवडा होता. आंबे, द्राक्ष कलिंगड, खरबूज खरेदीवर ग्राहकांचा भर होता.
पेट्रोल पंप, बसस्थानकावर गर्दी
बुधवारी दुपारपासूनच शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी होती. दहा दिवस इंधन उपलब्ध होणार नसल्याने वाहनधारकांनी अतिरिक्त खरेदीसाठी तजवीज केली. बीड शहरासह जिल्ह्यातही अशीच स्थिती होती. दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर झाल्याने शहरातील विद्यार्थी आणि नागरिक आपापल्या गावी परतण्यासाठी बीड येथील बसस्थानकात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकातही प्रवाशांची गर्दी दिसून आली.
जिल्ह्यात परवानगीशिवाय प्रवेश नाही, जाणाऱ्यांना पास
बीड जिल्ह्यात परवानगीशिवाय प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, सीमा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या कालावधीत शहरातील नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी तसेच येण्यासाठी संबंधित तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर त्यांना पास दिला जाणार आहे. आदेशानुसार या काळात अत्यावश्यक सेवेतील वगळून इतर सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने दुचाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णत: बंद राहणार आहेत.
वाइन शॉपवर गर्दी उसळली
जिल्ह्यातील वाइन शॉपवर मद्यशौकिनांची गर्दी दिसून आली. धुरवड साजरी करण्यासाठी चार दिवस आधीच नियोजन करून मोठ्या प्रमाणात मद्य खरेदी केल्याचे दिसून आले.
===Photopath===
250321\img20210325192407_14.jpg