पुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरणासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:34 AM2021-04-24T04:34:01+5:302021-04-24T04:34:01+5:30
अंबाजोगाईत २४ हजारांचा टप्पा पूर्ण : सोशल डिस्टन्सचा अभाव अंबाजोगाई : तालुक्याने लसीकरणाचा २४ हजारांचा टप्पा पार केला आहे. ...
अंबाजोगाईत २४ हजारांचा टप्पा पूर्ण : सोशल डिस्टन्सचा अभाव
अंबाजोगाई : तालुक्याने लसीकरणाचा २४ हजारांचा टप्पा पार केला आहे. लसींच्या पुरवठ्यात सातत्य नसल्याने साठा उपलब्ध होताच लसीकरणासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. परिणामी वाढती गर्दी कोरोना प्रसारास कारणीभूत ठरू नये, याची दक्षता प्रशासनाने घेणे गरजेचे बनले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या वतीने लसीकरणाची मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत तालुक्यात आजपर्यंत २४ हजार १०९ नागरिकांना कोरोनापासून संरक्षण करणारी लस देण्यात आली आहे. अंबाजोगाईतही या लसीकरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अंबाजोगाई शहरात स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व खडकपुरा येथे असलेल्या आरोग्य केंद्रात अशा दोन ठिकाणी लसीकरण सुरू आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. तालुक्यातील या सर्व केंद्रांवर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे यांनी केले आहे. मात्र लसींचा नियमित पुरवठा शासनाकडून होत नसल्याने अनेकांना लस संपल्यास हेलपाटे होतात, तर लसी उपलब्ध झाल्यास लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी वाढते. या वाढत्या गर्दीला रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. ही वाढती गर्दी पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवू शकते, अशी भीती आहे.
असे झाले लसीकरण
स्वा. रा. ती. रुग्णालय - १०,४६२
खडकपुरा आरोग्य केंद्र - ३,०६०
धानोरा ग्रामीण रुग्णालय - १,३५९
आपेगावच्या प्रा.आरोग्य केंद्र- २,१४९
बर्दापूर प्रा. आरोग्य केंद्र - १,६७४
भावठाणा प्रा. आरोग्य केंद्र - १,५५५
घाटनांदूर प्रा. आरोग्य केंद्र -२,०६८
उजनी प्रा. आरोग्य केंद्रात -१,७८२
-----------
लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा
अंबाजोगाई शहराची वाढती लोकसंख्या व व्याप्ती पाहता शहरात फक्त मेडिकल कॉलेज व खडकपुरा या दोन ठिकाणीच लसीकरण होते. पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. याचा ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास होतो. यासाठी शहरात आणखी दोन लसीकरण केंद्र सुरू करावी अशी मागणी नगरसेवक संतोष शिनगारे,दिनेश भराडिया यांनी केली आहे.
===Photopath===
230421\avinash mudegaonkar_img-20210423-wa0040_14.jpg