कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची क्रुर थट्टा; कन्हैय्याकुमारची सरकारवर जोरदार टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 07:57 PM2017-11-06T19:57:03+5:302017-11-06T20:11:31+5:30
शेतक-यांची ही अवहेलना दूर करून त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या पाहिजेत अशी मागणी जेएनयुचे नेते कन्हैय्या कुमार यांने केली.
अंबाजोगाई ( बीड ) : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी म्हणजे त्यांची क्रुर थट्टाच आहे. चॉकलेट ही येत नाही इतके कमी पैसे शेतक-यांचे माफ झाले. याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.शेतक-यांची ही अवहेलना दूर करून त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या पाहिजेत अशी मागणी जेएनयुचे नेते कन्हैय्या कुमार यांने केली. अंबाजोगाई येथील काँ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतीदिनानिमात्ताने सभेत तो बोलत होता.
काँ. गंगाधर अप्पा बुरांडे स्मृती प्रतिषठानच्या वतीने माजी खासदार काँ. गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या ९ व्या स्मृतीदिनानिमात्त येथील शंकर महाराज वंजारी वसतिगृहाच्या मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत कामगार नेते काँ. भालचंद्र काँगो हे होते.
आपल्या भाषणात कन्हैया कुमारने मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर आवाज उठवत मोदी सरकारने आपल्या तीन वर्षाच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयावर टीकेची झोड उठवली. सामान्य माणसाला अच्छे दीन आने वाले है चा नारा देत नरेंद्र मोदी यांनी केंद्रशासनाची सत्ता हाती घेतली, मात्र तीन वर्षे संपली तरी ते सामान्य माणसाच्या आयुष्यात अच्छे दीन आणू शकले नाहीत. प्रत्येक भाषणात वेगवेगळी प्रलोभणे दाखवणारे मोदी आपले एकही आश्वासन पुर्ण करु न शकल्यामुळे ते पुर्णत: एकाकी पडले असून सामान्य माणसाच्या रोषाला बळी पडू लागले आहेत. मोदी सरकारने घेतल्या नोटाबंदी, जेएसटी, वृत्तपत्र स्वातंत्र्यासंबंधी घेतलेल्या अनेक जाचक अटींचे निर्णय, वाढती महागाई, जातीयवादी संघटनांना पाठबळ देण्याचे धोरण असे अनेक निर्णय भारताची लोकशाही खिळखीळी करुन हुकुमशाही वृत्ती निर्माण करण्यासाठी पुरक ठरत असून केंद्र शासनाच्या या भुमिकेविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली असल्याचे त्यांने सांगितले.
मूळ प्रश्नांना बगल
तसेच सामान्य माणसांच्या देशभक्ती वरच मोदी सरकारने प्रश्न चिन्ह निर्माण केले असून लोकांची देशभक्ती ही त्यांच्यामध्ये असलेल्या हिंदुत्ववादी धोरणाविरुद्ध ठरवण्याचे काम या सरकारने सुरु केले आहे. आज सामान्य माणसांचे प्रश्न वेगळे असून शेतक-यांच्या आत्महत्या, बेरोजगार, महिला विषयक धोरण, आर्थिक बळकटी, भुक, दारीद्र्य या प्रश्नांकडे सोयीस्कर रित्या बगल दिली जात आहे. यामुळे लोकांचे लक्ष राष्ट्रवादाकडे वळवण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असून यासर्व कारभाराविरुध्द देशभर व्यापक चळवळ उभी करण्याची गरज असून या चळवळीचा मी एक सामान्य हिस्सा असून या चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी त्याने केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला कन्हैय्या कुमार यांनी भाजपाचे खा. प्रमोद महाजन, खा. गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य लोकांप्रति आदरभाव ठेवून केलेल्या कामाप्रति आदरभाव व्यक्त केला.
सुरुवातीला प्रास्ताविकात सभेच्या आयोजनामागील पार्श्वभूमी सांगताना काँ. माजी खासदार गंगाधर अप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठानचे अँड. अजय बुरांडे यांनी काँ. गंगाधर अप्पा यांनी बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेसाठी केलेल्या कामाची माहिती दिली. यामुळेच अप्पांच्या स्मृती जागवण्यासाठी गेली आठ वर्षापासून महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून वक्त्यांना बोलावण्यात येते असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात काँ. भालचंद्र काँगो यांनी अंबाजोगाई हे मराठवाड्यातील चळवळीचे केंद्र असल्यामुळे कन्हैय्या कुमार यांच्या भाषणाच्या आयोजनाला वेगळे महत्त्व असल्याचे सांगून अप्पांच्या स्मृतीदिनानिमात्त अशा प्रबोधनाची सुरु केलेल्या चळवळीचे कौतुक केले. पुढे बोलताना त्यांनी आजच्या परिस्थितीवर भाष्य केले.
या जाहीर सभेस डॉ. व्दारकादास लोहिया, प्रा. सुशिला मोराळे, ज्येष्ठ पत्रकार लेखक अमर हबीब, स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ यादव, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, शहराध्यक्ष महादेव आदमाने, नंदकिशोर मुंदडा, डॉ. श्रीहरी नागरगोजे, प्रा. एस के. जोगदंड, प्रा. नानासाहेब गाठाळ यांच्या सह डाव्या विचारसणीशी निगडित असलेल्या अनेक ज्येष्ठ मान्यवर कार्यकर्त्यांनी कन्हैय्या कुमार यांचे विचार ऐकण्यासाठी हजेरी लावली होती. युवकांचा ही उत्स्फूर्त प्रतिसाद या जाहीर सभेस मिळाला.