सीएस साहेब, एक तर मला मध्ये जाऊ द्या.. नाही तर तुम्ही डबा द्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:35 AM2021-05-19T04:35:03+5:302021-05-19T04:35:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : सीएस साहेब, माझ्या वडिलांचे वय ८५ वर्षे असून त्यांना चालताही येत नाही. अंथरूणाला खिळून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सीएस साहेब, माझ्या वडिलांचे वय ८५ वर्षे असून त्यांना चालताही येत नाही. अंथरूणाला खिळून आहेत. इथले जेवण खात नाहीत म्हणून घरून डबा आणला, पण पोलीस आतमध्ये जाऊ देत नाहीत. आता तुम्हीच सांगा, मी विनाकारण जात आहे का. मला आत जाऊ द्यायचे नसेल तर तुम्ही डबा द्या, असा संताप एका मुलाने आपल्या बापासाठी व्यक्त केला. विशेष म्हणजे ढिसाळ नियोजनाच्या विरोधात हा मुलगा जेवणाचा डबा घेऊन थेट सीएसच्या कक्षात दाखल झाला होता.
जिल्हा रुग्णालयातील सुविधा, उपचार आणि नियोजनाविरोधात तक्रारी वाढत आहेत. त्यातच आता कोरोना वॉर्डमध्ये नातेवाइकांचा प्रवेश बंद केला आहे. ही बाब संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने योग्य असली तरी आतमध्ये सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. आतमध्ये गंभीर व वृद्ध रुग्णांना कोणी मदत करत नसल्याचेही अनेकदा समोर आलेले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी नातेवाइकांची गरज असते; परंतु काही लोक काम नसतानाही आत-बाहेर करतात, त्यामुळे खरे कारण असलेल्या लोकांनाही आतमध्ये जाऊ देत नाहीत. असाच प्रकार मंगळवारी दुपारी घडला. एका ८५ वर्षीय पित्याचा मुलगा बाहेर उभा होता. वारंवार विनवणी करूनही पाेलीस आत जाऊ देत नव्हते. मध्ये वडील उपाशीपोटीच होते. अखेर या संतापलेल्या मुलाने थेट जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांच्या कक्षात डबा घेऊन धाव घेतली. आता मी काय करू? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यानंतर डॉ. गित्ते यांनी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांना बोलावून घेत पास दिला; परंतु दिवसभरात असे अनेक मुले, मुली, इतर नातेवाईक हे जेवण व आतमध्ये मदत करण्यासाठी आसुसले होते; परंतु केवळ आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे त्यांना आतमध्ये जाता आले नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला.
ढिसाळ नियोजन अन् कारभार
रुग्णालय प्रशासनाने आतमध्ये डबे पोहोचविण्यासाठी १० वॉर्डबॉयची नियुक्ती केल्याचा दावा केला होता; परंतु गेटवर कोणीच हजर नसते. तसेच गरजू रुग्णांच्या सेवेसाठी नातेवाइकांना आत सोडण्याची जबाबदारी आरएमओंवर दिल्याचे सांगण्यात येते; परंतु त्यांना भेटू दिले जात नाही. तसेच सामान्यांना काहीच माहिती नसते. मदत केंद्र केवळ वास्तू बनले आहे. येथून काहीच मदत होत नाही. अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सामान्यांना सहन करावा लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शाहेद पटेल यांनी केला आहे.
....
जोपर्यंत आरोग्य विभागाचा माणूस सांगत नाही, तोपर्यंत कोणलाही आत सोडू नका असे आदेश आहेत. त्यामुळे यात आमचा काही हेतू नाही. जसे आदेश येतील, त्याचे पालन केले जाईल.
-रवी सानप, पोलीस निरीक्षक, बीड शहर.
...
जे गंभीर व वृद्ध रुग्ण आहेत, त्यांना मदतीची गरज असते. अशा नातेवाइकांना आत सोडण्यासाठी आरएमओंना सांगितलेले आहे. याची सर्व जबाबदारही त्यांची आहे. आता यापुढे पोलिसांनाही सूचना केल्या जातील.
-डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.
...
जवळपास ७०० रुग्ण दाखल असतील. त्यात आतापर्यंत ७ लोकांना आत सोडले आहे. जेवढे लोक माझ्याकडे आले त्यांना मदत केली.
डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.
===Photopath===
180521\18_2_bed_13_18052021_14.jpeg
===Caption===
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांच्या कक्षात जेवणाचा डब्बा घेऊन गेलेले वृद्ध रूग्णाचे नातेवाईक.