कापसात गांजाची लागवड; चार महिन्यांपासून फरार गांजा तस्कराच्या आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:54 PM2023-03-29T12:54:29+5:302023-03-29T12:55:17+5:30
कापूस पिकात १३० गांजाची झाडे लावल्याचे झाले होते उघड
- नितीन कांबळे
कडा- कापसाच्या शेतात गांजाची लागवड करून विक्री केल्याप्रकरणी चार महिन्यांपासून फरार असलेल्या गांजा तस्कराच्या अखेर अंभोरा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान मुसक्या आवळत अटक केली. हनुमंतअर्जुन पठारे (रा.बाळेवाडी ता.आष्टी )असे आरोपीचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथील हनुमंत अर्जुन पठारे याने स्वतःच्या शेतात कापूस पिकात १३० गांजाची झाडे लावल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा, अंभोरा पोलिसांना मिळाली. यावरून ९ डिसेंबर २०२२ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ७ लांखाचा गांजा जप्त केला. मात्र, यावेळी हनुमंत पठारे पसार झाला होता. आरोपी ओळख लपवत पोलिसांना गुंगारा देऊन पुणे, शिरूर, अहमदनगर या ठिकाणी फिरत होता. दरम्यान, आरोपी पठारे मंगळवारी राहत्या घरी आल्याची गोपनीय माहिती अंभोरा पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी पठारेच्या मुसक्या आवळल्या.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने, आदिनाथ भडके, अंमलदार शिवदास केदार यांनी केली.