रेडिओफ्रिक्वेन्सी मीटरमुळे ग्राहकांचे धाबे दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 06:22 PM2019-07-17T18:22:55+5:302019-07-17T18:27:19+5:30
गैरसमज दूर करण्यासाठी वीज बिलाचे प्रात्यक्षिक दर्शविणारी कार्यशाळा
अंबाजोगाई (बीड ) : वीज ग्राहकांच्या वीजबिलासंदर्भात येणाऱ्या अमर्याद तक्रारींना आळा घालण्यासाठी अत्याधुनिक तंत्र प्रणालीने बनवण्यात आलेले रेडिओ फ्रिक्वेन्सी वीज मीटर बसवण्यात आल्यानंतर वीज ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बीलामुळे तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नेहमीच्या वीज बीलापेक्षा साधारणत: तिप्पट ते चौपट रकमेची वीज बिले या महिन्यात उपलब्ध झाली असल्यामुळे वीज ग्राहकांचे धाबे दणाणले आहेत.
वीज बिलासंदर्भात वीज ग्राहकांच्या तक्रारी नियंत्रणात आणण्यासाठी महावितरण कार्यालयाच्या वतीने दोन महिन्यापासून शहरातील १९ हजार वीज ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलून अत्याधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी प्रणालीने बनवण्यात आलेले वीज मीटर बसवण्यात आले आहेत. सदरील वीज मीटर बसवण्यात आल्यानंतर या आठवड्यात वीज बिले ग्राहकांच्या मोबाईलवर वीज वितरण कंपनीच्या वतीने नुकतेच अपलोड करण्यात आले आहेत. ज्या ग्राहकांना सदरील वीज मीटर बसवण्यापूर्वी साधारणत: एक हजार रुपये वीज बील यायचे त्या ग्राहकाला तीन ते चार हजार रुपयांच्या वीज बीलाची आकारणी करण्यात आली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवून आलेली सदरील वाढीव वीज बीले आता भरायची कशी? असा प्रश्न सर्वसामान्य वीज ग्राहकांना पडला असून ही वाढीव वीज बील आकारणी अत्यंत जाचक आणि सर्वसामान्य ग्राहकांवर अन्याय करणारी असल्याची भावना वीज ग्राहकात निर्माण झाली असून वीज वितरण कार्यालयाविरुध्द तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वीज वितरण कंपनीने यापुर्वीच विविध करांचा बोझा वीज बील आकारणीत लावला असल्यामुळे प्रत्यक्ष वापरलेल्या बिलावरील करांचा बोझा वाढला असल्यामुळे अगोदरच वीजबिलाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता रेडिओफ्रिक्वेन्सी प्रणालीच्या वीज मीटरमुळे बिलांची रक्कम तिप्पट ते चौपट वाढल्यामुळे वीज ग्राहकांचे कंबरडेच मोडले आहे. नवीन रेडिओफ्रिक्वेन्सी वीज मीटर बसविण्यात आल्यानंतर वीज बिलात वाढ झाल्यामुळे नागरिक हैराण झाले असून, वीज बिलावाढीतील तफावत पाहून वीज ग्राहकांना चांगलाच शॉक बसला असून, याबाबत ग्राहक आंदोलनाच्या तयारीत आहेत.
एका महिन्याचे बील ३०,३४०/-
अंबाजोगाई शहरातील मोंढा विभागातील वीज ग्राहक अॅड.सुनील प्रकाशराव पन्हाळे यांना या महिन्यात मीटर क्रमांक ५७१०१०४५७८९८ या नवीन मीटरने एका महिन्याच्या वीजबील वापरापोटी रु. ३०,३४०/- रुपयांची बील आकारणी केली आहे. वास्तविक अॅड. सुनील पन्हाळे यांनी सदरील नवीन मीटर बसवण्यात आल्यानंतर लगेचच तीन दिवसांत सदरील मीटर रीडिंगबद्दल लेखी तक्रार वीज वितरण कार्यालयाकडे देवून वीज मीटर बदलून दुसरे मीटर बसवण्याची मागणी केली होती. मात्र वीज कार्यालयाने या मागणीकडे दुर्लक्ष केले.
लवकरच कार्यशाळा
वीज ग्राहकांमध्ये निर्माण झालेला वाढीव वीज बीलाचा गैरसमज त्यांच्या मनातुन काढण्यासाठी रेडिओफ्रिक्वेन्सी प्रणालीचा वापर करून बनवण्यात आलेल्या वीज मीटरची बील बनवण्याची प्रणाली कशी काम करते, याचे प्रात्यक्षिक दर्शवणारी एक कार्यशाळा घेण्यात येणार असून या कार्यशाळेत सहभाग घेवून वीज ग्राहकांनी आपल्या शंकांचे निरसण करुन घ्यावे, असे आवाहन ही उपअभियंता संजय देशपांडे यांनी केले आहे.
आक्रमक पावित्रा घ्यावा
अंबाजोगाई शहरातील रेडिओफ्रिक्वेन्सी प्रणालीव्दारे बसवण्यात आलेली ही वीज मीटर अव्वाच्यासव्वा बीले देत असल्यामुळे वीज ग्राहक संतप्त झाला आहे. वीज मंडळाच्या या आवाजवी वीज आकारणीच्या विरोधात कायदेशीर आक्रमक पावित्रा घेण्यासाठी ‘वीज ग्राहक हक्क संघर्ष समिती’ निर्माण करण्याचा विचार करीत आहेत. वाढीव वीज बिलाबाबत महावितरणने विचार करण्याची मागणी वीज ग्राहकांतून होत आहे.
तंतोतंत नोंदीप्रमाणे बील
या संदर्भात वीज वितरणचे उपभियंता संजय देशपांडे यांच्याशी संपर्क साधुन या वाढीव वीज बीलासंदर्भात चर्चा केली असता रेडिओफ्रिक्वेन्सी प्रणालीव्दारे बनवण्यात आलेली ही वीज मीटर अत्यंत संवेदनशील असून कितीही कमी प्रमाणात वीज वापरली तरी त्याची लगेचच नोंद हे मीटर घेत आहे. वापरलेल्या वीजेची तंतोतंत नोंद करुन त्याची बीले वीज ग्राहकांना मिळत आहेत, त्यामुळे ग्राहकांना वीज बील हे वाढीव आले असल्याचे वाटत आहे.