शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओंचे कट्टे; घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:41 AM2021-09-16T04:41:44+5:302021-09-16T04:41:44+5:30

रिॲलिटी चेक बीड : रस्त्याने जाणाऱ्या मुलीकडे पाहून टोमणे मारणे, अश्लील गाणे वाजविणे, हातवारे करणे, डोळ्याने खुणावणे, धूमस्टाइल वाहने ...

Cuts of rhododendrons all over the city; How safe is a girl who is out of the house? | शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओंचे कट्टे; घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती?

शहरात ठिकठिकाणी रोडरोमिओंचे कट्टे; घराबाहेर पडलेली मुलगी सुरक्षित किती?

Next

रिॲलिटी चेक

बीड : रस्त्याने जाणाऱ्या मुलीकडे पाहून टोमणे मारणे, अश्लील गाणे वाजविणे, हातवारे करणे, डोळ्याने खुणावणे, धूमस्टाइल वाहने पळवून पाठलाग करणे तसेच नजर रोखून पाहणे... हे किळसवाणे प्रकार नित्याचे झाले आहेत. शहरातील वर्दळीचे रस्ते, चौक रोमिओंचे अड्डे बनले असून घराबाहेर पडलेली मुलगी परत सुरक्षित परतेल की नाही, अशी चिंताजनक स्थिती आहे. धक्कादायक म्हणजे, शक्ती पथक केवळ कागदावर उरले असून कारवाया थंडावल्याने रोमिओंना मोकळे रान मिळत आहे.

मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पोलीस दलात दामिनी पथकाची निर्मिती केली होती. साडेतीन वर्षांपूर्वी दामिनी पथकाचे नामकरण ‘शक्ती पथक’ असे करण्यात आले. महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस सदैव दक्ष आहेत, असा दावा करण्यात आला. काही दिवस पथकाने चांगली कामगिरी केली. छेड काढणाऱ्या टवाळखोरांना वठणीवर आणले. मात्र, कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. अजूनही शाळा, महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. शिकवणी वर्ग सुरू करण्यासदेखील परवानगी मिळालेली नाही. लॉकडाऊनमध्ये ठीक; पण अन्लॉकनंतर शक्ती पथक सक्रिय होणे अपेक्षित होते. मात्र, सध्या सणासुदीचे दिवस असतानाही कारवाया थंडावलेल्या असून रोमिओंना मोकळे रान आहे. जिल्हास्तरावरील एक व सर्व पोलीस ठाण्यांतील मिळून २८ पथके नेमली होती. मात्र, रोमिओंविरुद्ध कारवाया दिसत नाहीत.

....

या ठिकाणचे रोडरोमिओ पोलिसांना दिसत नाहीत का?

बसस्थानक

येथे मुली, महिलांची लगबग असते. तेथे रोमिओंकडून सर्रास छेडछाड होते. काहीवेळा पाठलागही करतात. बसमधील गर्दीचा फायदा घेत काही टवाळखोर छेड काढतात.

सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स

नशेखोरांचा हा अड्डा आहे. येथे कॉफीची मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. सिगारेटचे झुरके ओढत बसलेल्या तरुणांकडून रस्त्याने ये-जा करणाऱ्या तरुणींची छेड काढली जाते. पाेलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

भाजी मंडई

येथे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात मुली, महिला येतात. मुद्दामहून गर्दी करणे, टिंगलटवाळी करणे व पाठलाग करून छेड काढण्याचे प्रकार होतात. रोमिओंसोबतच मोबाइल चोरांची येथे दहशत आहे.

....

कोणी छेड काढत असेल तर येथे संपर्क साधा

छेडछाड तसेच महिलांसंबंधी तक्रारींसाठी १०९१ हा टोल-फ्री क्रमांक आहे. यासह १०० क्रमांक डायल करूनही पोलिसांची मदत घेता येईल. यासोबतच संबंधित पोलीस ठाण्याच्या लँडलाईन क्रमांकावरही कॉल करता येऊ शकतो.

...

शक्ती पथक दिसेना, रोमिओंना रान मोकळे

कोरोनामुळे शक्ती पथकाचे कामकाज विस्कळीत झाले, ते अद्यापही सुरळीत झालेले दिसत नाही. त्यात १० मे २०२१ रोजी शक्ती पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक राणी सानप यांची बदली झाली. त्यानंतर या पथकाच्या प्रमुख म्हणून उपनिरीक्षक मनीषा लटपटे यांची नियुक्ती केल्याचे सांगितले जाते. मात्र, पथकातील काही अंमलदारांच्याही बदल्या झाल्या असून तेथे नवीन अंमलदार नेमलेले नाहीत. त्यामुळे शक्ती पथक कार्यान्वित आहे की नाही, असा प्रश्न आहे.

....

शक्ती पथकाचे कामकाज सुरू आहे. तेथील पूर्वीच्या महिला अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर नवीन महिला अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. नियमित कारवाया सुरू आहेत. कामकाजाचा आढावादेखील घेतला जातो.

- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड

...

Web Title: Cuts of rhododendrons all over the city; How safe is a girl who is out of the house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.