'पपा, मी चाललोय... तुम्ही लवकर या...'; वडिलांना फोन करून प्राध्यापक मुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 02:43 PM2022-05-18T14:43:30+5:302022-05-18T14:43:47+5:30
सोबत जेवण केल्यानंतर वडील शेतात गेले, तेव्हा मुलाचा कॉल आला
बीड : पप्पा, मी चाललाेयं.. तुम्ही लवकर या... असा फोन वडिलांना करून प्राध्यापक मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील नगर रोडवरील चऱ्हाटा फाटा परिसरात घडली.
प्रा. नितीन विठ्ठल तुपसौंदर (वय ३०, रा. खोकरमोहा, ता. शिरूर, हमु. चऱ्हाटा फाट्याजवळ, बीड ) असे मृताचे नाव आहे. ते पिंपळनेर (ता. बीड) येथील जीवनदीप महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी माहेरी गेली होती. निवृत्त मुख्याध्यापक असलेले वडील व नितीन हे दोघेच घरी होते. १५ मे रोजी सकाळी नितीन यांनीच स्वयंपाक केला, त्यानंतर पिता-पुत्रांनी जेवण केले. वडील विठ्ठल तुपसौंदर हे खोकरमोहा येथे शेतात गेले. दुपारी १२ वाजता नितीन यांनी घरातील पंख्याला साडीने गळफास घेतला. त्यापूर्वी त्यांनी वडिलांना शेवटचा कॉल केला.
पप्पा मी चाललोय... तुम्ही या... असे म्हटल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, वडिलांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला; पण नितीन यांनी मोबाईल कट करून आत्महत्या केली. शिवाजीनगर ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक वसुदेव मिसाळ, पोलीस नाईक अंबादास औसरमल यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.