अवकाळी पावसामुळे ११०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:03 AM2021-02-21T05:03:42+5:302021-02-21T05:03:42+5:30
१८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यत जवळपास सर्वच तालुक्यांत अवकाळी पाऊस आला होता. यामध्ये फळबागा व शेतात काढून ठेवलेले ...
१८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यत जवळपास सर्वच तालुक्यांत अवकाळी पाऊस आला होता. यामध्ये फळबागा व शेतात काढून ठेवलेले हरभरा पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनास आदेश दिले होते. त्यामुसार महसूल व कृषी विभागातर्फे संयुक्त पंचनामे करण्यात आले. यामध्ये परळी, धारूर व केज तालुक्यातील काही भागांत पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये जिरायती क्षेत्रावरील २ हजार ३६३ हेक्टर, बागायती ८२५, तर फळपिके १६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे, तर अहवालानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र हे ११०३ इतके आहे. शासननिर्णयाप्रमाणे ११०३ हेक्टरवरील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे.
चौकट
जनावरे दगावले; नुकसान मात्र नाही
पाटोदा तालुक्यातील काही गावांमध्ये शेळ्या दगावल्याचे अहवालात नमूद आहे. मात्र, पाटोदा तालुक्यात पिकांचे नुकसान झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पंचनामे न करता अहवाल दिल्याचा आरोप बीडसह अन्य तालुक्यांतील शेतकऱ्यांमधून केला जात आहे.
अंबाजोगाई तालुक्यातदेखील नुकसान झाले असून, त्याचादेखील समावेश नाही. त्यामुळे उर्वरित तालुक्यांत फेरपंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.
कोट
प्रशानाकडून नुकसानभरपाईचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार नुकसानभरपाईसंदर्भात मंत्रालय पातळीवर निर्णय झाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.
-संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड