वाहनांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:30 AM2021-05-22T04:30:26+5:302021-05-22T04:30:26+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात तसेच ग्रामीण भागात रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले ...
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात तसेच ग्रामीण भागात रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. तसेच लहान-मोठे मातीचे ढीग यामुळे एस. टी. बस व खाजगी वाहने आदळून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अंबाजोगाई आगाराच्या बस आदळून आदळून खिळखिळ्या झाल्या आहेत. याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. यासाठी या रस्त्याची लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
काटेरी झुडपे वाढली
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यानजीक काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व रस्त्याच्या कडेला पाणी साठलेले राहिल्याने परिसरात काटेरी झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आता वाढलेली ही झुडपे रस्त्यावर आल्याने दुचाकी व चार चाकी वाहनचालकांना वाहन चालविताना त्रास होत आहे. अनेकांना या काटेरी झुडपांमुळे इजाही झालेली आहे.
आठ तास वीजपुरवठ्याची प्रतीक्षा
अंबाजोगाई : नवीन कृषीपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे, अशी घोषणा ऊर्जामंत्र्यांनी केली. परंतु अद्याप शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. अजूनही रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरूच आहे. शेतकऱ्यांना रात्री जागून रब्बी हंगामातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
दंड होत नसल्याने बेफिकिरी वाढली
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन तालुक्यात होत नाही. प्रशासनही याबाबत उदासीन आहे. अंबाजोगाई नगर परिषद प्रशासन व पोलीस ठाण्याच्या वतीने मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांवर एक दिवस कारवाई करण्यात आली. हे कारवाईचे सत्र एक दिवसातच संपले. दंड होत नसल्याने नागरिकांतही बेफिकिरी वाढली आहे.