वाढदिवसाला डीजे वाजवत नाचणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:09+5:302021-06-29T04:23:09+5:30
केज : डीजेच्या तालावर नाचत वाढदिवस साजरा करण्याचे केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील युवकाला चांगलेच महागात पडले. वाढदिवसाला डीजे ...
केज : डीजेच्या तालावर नाचत वाढदिवस साजरा करण्याचे केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील युवकाला चांगलेच महागात पडले. वाढदिवसाला डीजे वाजवून जल्लोष केल्याप्रकरणी बोबडेवाडी येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी केज तालुक्यातील बोबडेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेसमोर अमर बोबडे याचा वाढदिवस साजरा करत तरुण डीजेच्या तालावर नाचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर, केज पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्यांना मोठ्या आवाजात डीजे वाजवून काही युवक नाचत असल्याचे दिसून आले. मात्र, पोलिसांना पाहताच नाचणारे युवक पळून गेले.
पोलिसांनी डीजे मालक महेश जाधव यांच्याकडे चौकशी केली. त्या आधारे पोलीस कर्मचारी धनपाल लोखंडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात अमर भारत बोबडे, संतोष क्षीरसागर, निरंजन बोबडे, अक्षय अर्जुन कोठुळे, ओम बाबासाहेब करपे, ज्ञानेश्वर शिवाजी बोबडे, गणेश महादेव आदमाने, तेजेस जनार्दन बोबडे आणि अण्णा बोबडे सर्व रा.बोबडेवाडी यांच्या विरुद्ध विविध कलमांसह साथरोग प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. दिनकर पुरी हे करीत आहेत.