बीडमधील सिंदफना व गोदावरी काठच्या गावांना पुराचा धोका 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 05:53 PM2017-08-30T17:53:13+5:302017-08-30T17:53:13+5:30

माजलगांव धरण गेल्यावर्षी परतीच्या पावसाने 24 तासांत मृत साठ्यातुन बाहेर येऊन शंभर टक्के भरुन वाहिले. त्यामुळे सध्या   पावसाची परिस्थिती पाहता अशी परिस्थिती केव्हाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे माजलगांव तालुक्यातील गोदावरी व सिंदफना नदीच्या काठावर असणा-या 23 गावच्या नागरिकांना याचा धोका निर्माण होतो.

The danger of flood of Sindhfana and Godavari Kath villages in Beed | बीडमधील सिंदफना व गोदावरी काठच्या गावांना पुराचा धोका 

बीडमधील सिंदफना व गोदावरी काठच्या गावांना पुराचा धोका 

googlenewsNext

माजलगाव ( बीड ), दि. 30 - माजलगांव धरण गेल्यावर्षी परतीच्या पावसाने 24 तासांत मृत साठ्यातुन बाहेर येऊन शंभर टक्के भरुन वाहिले. त्यामुळे सध्या   पावसाची परिस्थिती पाहता अशी परिस्थिती केव्हाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे माजलगांव तालुक्यातील गोदावरी व सिंदफना नदीच्या काठावर असणा-या 23 गावच्या नागरिकांना याचा धोका निर्माण होतो. मागील काळात अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील 30 वर्षांपासून रखडत पडलेला असल्यामुळे या गावांमधील नागरिकांची झोप उडाली आहे.   

सिंदफना व गोदावरी पात्राला लागून माजलगांव तालुक्यात 27 गावे आहेत सन 1989 साली दोन्ही धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे या गावांना पुराचा वेढा बसला होता. तत्कालीन प्रशासनाने या गावांचे पुनर्वसन करण्यासाठीची प्रकिया सुरु करण्यात आली. मात्र त्यानंतर तब्बल 17 वर्षे पूरपरिस्थिती निर्माण न झाल्यामुळे या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तसाच खितपत पडला. त्यानंतर सन 2006 मध्ये गोदावरी नदीपात्रात पैठण येथून पाणी सोडण्यात आले. त्याच वेळी माजलगांव धरणातून देखील पाणी सोडण्यात आल्यामुळे पुराची परिस्थिती गंभीर झाली होती आणि प्रशासनाला अक्षरशः शाळा महाविद्यालयांमध्ये कॅम्प लावून या गावांमधील नागरिकांची व्यवस्था करावी लागली होती.  त्यावेळी अनेकांचे संसार उघड्यावर येवून गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागला. पुन्हा प्रशासनाने पुनर्वसनाबाबतच्या धुळखात पडलेल्या फाईल 17 वर्षांनंतर बाहेर काढुन परत अहवाल शासनाकडे पाठविण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या मात्र त्यानंतर त्याचे काय झाले देवच जाणो. त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी  गोदाकाठ व सिंदफना काठच्या गावांच्या  पुनर्वसनासंदर्भात आवाज उठवून गोदापरिक्रमा करुन प्रत्येक गावाला भेटी देवून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. दरम्यान पुन्हा जवळपास 11 वर्षे पैठण येथील नाथसागर धरणाचे व माजलगांव धरणाचे  एकत्रित पाणी सोडण्याची वेळ आलेली नाही त्यामुळे पुन्हा पुनर्वसनाचा प्रश्न थंडबस्त्यात पडला. 

दरम्यान बीड येथील बिंदुसरा प्रकल्प हा पूर्णतः भरुन चादरीवरुन पाणी जात आहे. तसेच बिंदुसरा नदीला मागील तीन चार दिवसांपासून पूर आलेला आहे तर कुंडलिका प्रकल्पदेखील 100 टक्के भरुन वाहत आहे. त्यामुळे माजलगांव धरणाच्या पातळीत तीव्र वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. माजलगांव धरण भरण्यासाठी आता एक ते दोन चांगल्या पावसांची आवश्यकता असून सध्याचे वातावरण पाहता मोठा पाउस झाल्यास हे धरण भरण्यास काहीच वेळ लागणार नाही तर तिकडे पैठण येथील नाथसागर हे धरण देखील जवळपास भरत आलेले आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही धरण भरल्यास सिंदफना व गोदावरी नदीत एकाच वेळी विसर्ग करण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे पुनर्वसना अभावी नदीकाठीच राहिलेल्या गावांमधून पुराचा धोका निर्माण झालेला असल्यामुळे या गावांमधील नागरीकांच्या झोपा उडालेल्या आहेत. तर सांडस चिंचोली या संपूर्ण गावाला माजलगांव धरणातील पाणी सोडल्यास संपूर्ण वेढा पडतो त्यामुळे पावसाळा सुरु होताच येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. 

गोदावरी नदीपात्रा शेजारी येणारी गावे 

गोदापात्राजवळ माजलगांव तालुक्यातील रिधोरी, कवडगांवथडी, शेलगांवथडी, गव्हाणथडी, काळेगांव थडी, डुब्बा थडी, हिवरा, सादोळा, पुरुषोत्तमपुरी, महातपुरी, जायकोचीवाडी, मंजरथ, सांडसचिंचोली, सरवरपिंपळगांव, आबेगांव, छत्रबोरगांव गंगामसला, सोन्नाथडी, सुरुमगांव, शु.ति.लिमगांव, गुंजथडी, आडोळा, खतगव्हाण, मोगरा, पिंपरी खुर्द ही गावे येतात. 

सिंदफना नदीपात्रा शेजारी येणारी गावे 

माजलगांव, मनुर, शिंपेटाकळी, लुखेगांव, ढेपेगांव, सांडसचिंचोली. 

 आपत्ती व्यवस्थापन कक्ष लागला कामाला 

तालुक्यात मागील 30 वर्षांच्या काळात अनेकवेळा नैसर्गिक आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे अशावेळी जिल्हास्तरावरुन आपत्ती व्यवस्थापन करण्यात येते. दोनच दिवसांपूर्वी आपत्ती व्यवस्थापना संदर्भात बैठक झाली असून माजलगांव महसूल प्रशासनाचा आपत्तीव्यवस्थापन कक्ष सज्ज असल्याची तसेच पुनर्वसना संदर्भातील अहवाल वरिष्ठ स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती तहसीलदार एन.जी. झंपलवाड यांनी दिली.

 

Web Title: The danger of flood of Sindhfana and Godavari Kath villages in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.