धोकादायक ! बीडमध्ये कालबाह्य चॉकलेट-बिस्कीटांच्या विक्रीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 07:37 PM2018-06-13T19:37:30+5:302018-06-13T19:37:30+5:30
कालबाह्य झालेले बिस्कीट, चॉकलेट व इतर प्रॉडक्टस् बीडमधील एजन्सीचालकाकडून विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बीड : कालबाह्य झालेले बिस्कीट, चॉकलेट व इतर प्रॉडक्टस् बीडमधील एजन्सीचालकाकडून विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने अचानक टाकलेल्या धाडीत तब्बल ८ प्रॉडक्टस् कालबाह्य झाल्याचे आढळले आहे. बीडच्या एजन्सी चालकाकडून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.
शहरातील साठे चौकातील छत्रपती संकुलात असणाऱ्या श्रीराम दगडू लाखे यांच्या मालकीच्या पतंजली चिकित्सालय आलिश एजन्सीवर अन्न व औषध प्रशासनाने आज दुपारी साडेचार वाजता अचानक धाड टाकली. तपासणी केली असता यात तब्बल ८ प्रॉडक्टस् कालबाह्य झाल्याचे समोर आले. अन्न सुरक्षा अधिकारी ए. बी. भिसे, एच. आर. मरेवार, व्ही. ए. कुलकर्णी, बाळू शेंडगे यांनी हे सर्व नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, गुरुवारी ते औरंगाबादला पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.ही कारवाई सहाय्यक आयुक्त अभिमन्यू केरुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, लाखे विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
योगाच्या माध्यमातून जाहिरात
श्रीराम लाखे हे योग प्रशिक्षक आहेत. ते ठिकठिकाणी जाऊन आपल्या एजन्सीची जाहिरातही करतात. त्यामुळे नागरिक येथे खरेदीसाठी गर्दी करतात. यातूनच सर्वसामान्य नागरिकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन लाखे हे कालबाह्य झालेले प्रॉडक्टस् विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. एकीकडे योगा करायला लावून आरोग्य सुधारणा-या लाखे यांच्याकडून दुस-या बाजूला नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे समोर आले आहे.
कठोर कारवाई करण्यात येईल
माहिती मिळताच पतंजली एजन्सीवर जाऊन तपासणी केली. यावेळी ८ प्रॉडक्टस् कालबाह्य झाल्याचे आढळून आले. त्याचे नुमने औरंगाबादला पाठविले आहेत. लवकरच अहवाल प्राप्त होईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. कठोर कारवाई केली जाईल.
- अभिमन्यू केरुरे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन