दुष्काळ जाहीर करण्यासाठी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:37 PM2018-09-27T23:37:22+5:302018-09-27T23:38:36+5:30
पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचे पंचनामे तात्काळ करून दुष्काळ जाहीर करावा व दुष्काळासाठी असणाऱ्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, या मागणीसाठी राकाँच्या वतीने गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचे पंचनामे तात्काळ करून दुष्काळ जाहीर करावा व दुष्काळासाठी असणाऱ्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, या मागणीसाठी राकाँच्या वतीने गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात वारक-यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात भजने व कीर्तनाच्या माध्यमातून दुष्काळाची मागणी केली. तर करपलेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी नंदकिशोर मुंदडा यांनी केली. यावेळी आंदोलकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाºयांना दिले.
केज विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई, केज व नेकनूर परिसरात पेरणीनंतर पाऊस झाला नाही. कापसावर लाल्या रोग पडला आहे. तर पावसाअभावी सोयाबीनचे पीक करपले आहे. या पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत. बोंड अळीचे रखडलेले अनुदान तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, शेतकºयांनी आॅनलाईन पीकविमा भरला तो तात्काळ वाटप करण्यात यावा, घरगुती वीज बिल वाढ झाली रद्द करण्यात यावी. दुष्काळी स्थितीमुळे नादुरूस्त ट्रान्सफॉर्मरसाठी कृषी पंपांचे थकीत वीजबील भरण्याची सक्ती करू नये, नादुरूस्त ट्रान्सफॉर्मर तात्काळ बसवावेत, उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पंचनामे करून मदत मिळावी, जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था करावी, ज्या गावाला पिण्याच्या पाण्याची गरज आहे तिथे व्यवस्था व्हावी. शेतमजूरांना कामे उपलब्ध करून द्यावीत, तूर, उडीद, मूग, सोयाबीन, हरभरा, या पिकांची हमीभावात खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावेत, आदी मागण्या मांडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करुन राकाँच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी दिला आहे. यावेळी बाजार समिती सभापती मधुकर काचगुंडे, उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, पं.स. उपसभापती तानाजी देशमुख, नेताजी शिंदे, वैजनाथ देशमुख, नगरसेवक संतोष शिनगारे, दिनेश भराडिया, अॅड. संतोष लोमटे, राजकुमार गंगणे, शेख ताहेर आदींसह राकाँचे कार्यकर्ते सहभागी होते.
हुमणी अळीच्या नुकसानीचे पंचनामे करा
उसावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पंचनामे करुन मदत करण्यात यावी, जनावरांच्या चारा व पाण्याची व्यवस्था करावी, ज्या गावांना पिण्याची पाण्याची गरज आहे तेथे व्यवस्था करुन शेतमजूरांना कामे उपलब्ध करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.