बीडमध्ये घेता येणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन
By शिरीष शिंदे | Published: October 3, 2022 04:48 PM2022-10-03T16:48:50+5:302022-10-03T16:49:23+5:30
प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद बीड तालुक्यातील शिवणी येथील डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन नगर येथे बुधवारी दुपारी १२ वाजता होणार आहे.
बीड : ६७ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन व धम्म मिरवणुकीचे आयोजन धम्मचक्र प्रवर्तन दिन, ५ ऑक्टाेबर रोजी करण्यात आल्याची माहिती भिक्खू धम्मशील यांनी दिली.
बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रा. प्रदीप रोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे भिक्खू धम्मशील म्हणाले, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून बुद्ध मूर्तीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पवित्र अस्थिकलश व धम्म मिरवणुकीस बुधवारी सकाळी ८ वाजता प्रारंभ होईल. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कारंजा, बलभीम चौक, टिळक रोड, सुभाष रोड मार्गे डॉ. आंबेडकर पुतळा येथे थांबेल. तेथे डॉ. आंबेडकरांना अभिवादन करून धम्म ध्वजारोहण करून नाळवंडी नाका मार्गे शिवणी येथे मिरवणुकीचा समारोप होईल.
दरम्यान, शिवणी येथे २२ मे १९७७ मध्ये जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध बौद्ध भिक्खू डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन महाथेरो यांच्या उपस्थितीत धम्म दीक्षा सोहळा पार पडला होता. त्यावेळी २० ते २५ हजार उपासक उपस्थित होते. त्यावेळी भन्तेजींच्या हस्ते एका बोधीवृक्ष लावण्यात आला होता. तो बोधीवृक्ष आजही इतिहासाची साक्ष देत येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान बनत आहे. हा ऐतिहासिक बौद्ध वारसा जतन करण्यासाठी शिवणी येथे तिसऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनी केले असल्याचे भिक्खू धम्मशील म्हणाले.
तिसरी बौद्ध धम्म परिषद
प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेच्या वतीने तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद बीड तालुक्यातील शिवणी येथील डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन नगर येथे बुधवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, स्वागत अध्यक्ष म्हणून अनिल सावंत उपस्थित राहतील. भिक्खू डॉ. इंदवंस्स महाथेरो यांच्या हस्ते मुख्य धम्म ध्वजारोहण होईल तर भिक्खू सुमणवण्णो महाथेरो यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे.