'उद्याचा दसरा मेळावा कोणत्याही जातीपातीचा नाही, तर डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा मेळावा'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 02:44 PM2021-10-14T14:44:19+5:302021-10-14T14:45:52+5:30
'मेळाव्यात जे बोललं जातं ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांसाठी असतं.'
मुंबई: उद्या दसरा सण आहे, या सणाचे औचित्य साधुन विविध पक्ष मेळाव्याचे आयोजन करतात. यात सर्वाधिक चर्चा असते ती भगवानगड येथे होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याची. सर्व कोरोना नियम पाळून यंदाचा दसरा मेळावा होणार असल्याचं आधीच पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा नसून, डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा मेळावा आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.
उद्या भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत माहिती देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, दसरा मेळावा लोकांच्या आदेशावरुन आणि आग्रहावरून होत असतो. यावेळचं स्वरूप किती सुंदर आणि देखणं आहे हे केवळ तिथे येणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. मला विश्वास आहे मेळावा आगळावेगळा असेल दसऱ्याला भगवान बाबांच्या भक्तीचा मेळा जमतो. हृदयातून निघालेला संवाद हृदयापर्यंत पोहोचतो. हीच खरी नेतृत्वाची ताकद असते, असं त्या म्हणाल्या.
गोपीनाथ मुंडेंनी दिलेला वसा आणि वारसा...
त्या पुढे म्हणतात, लोकांनी मला आदेश द्यायचा आणि मी स्वीकारायचा हा माझ्या राजकारणाचा मूलमंत्र आहे. हा मेळावा एक वेगळा कार्यक्रम आहे. देशभरातील मोठमोठ्या कार्यक्रमांचा विचार केला तर प्रत्येक कार्यक्रमांमागे काही तरी एक संकल्प असतो. तसा या मेळाव्यामागे संकल्प आहे. डोंगरकपारीत कष्ट करणाऱ्यांचा मेळावा आहे, बहुजन आणि वंचितांचा हा मेळावा आहे. या मेळाव्यात कोणत्या जातीच्या वर्गाचा मेळावा नाही. हा कष्ट कऱ्यांचा मेळावा आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेला वसा आणि वारसा आहे. या मेळाव्यात जे बोललं जातं ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांसाठी असतं, असंही त्या म्हणाल्या.