शेतमजुराची मुलगी बनली जिद्दीने डॉक्टर
By admin | Published: March 22, 2017 01:21 AM2017-03-22T01:21:44+5:302017-03-22T01:22:25+5:30
फरास यांच्यातर्फे सत्कार : कोल्हापुरात शिकणाऱ्या बीडच्या कन्येचे प्रेरणादायी यश
कोल्हापूर : घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. आई-वडील शेतमजूर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केले. तिच्या या यशाची कहाणी ऐकून खासदार सुप्रिया सुळे यांनी तिची दखल घेतली आणि तिच्या मेहनतीला बळ मिळाले. अखेर ती डॉक्टर झाली. मनी बाळगलेली जिद्द पूर्णत्वास आली. याच कर्तृत्ववान डॉक्टर मुलीचा महापौर हसिना फरास यांनी सत्कार करून तिचे कौतुक केले.
कोणाही विद्यार्थ्याला प्रेरणा देईल अशीच ही कहाणी असून या कहाणीची नायिका आहे सारिका रघुनाथ माने! बीड जिल्ह्यातील शेतमजुरी करणाऱ्या रघुनाथ माने यांची कन्या सारिका माने. तिने अतिशय गरिबीतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सारिकाला १० वी व १२ परीक्षेत ९० टक्के गुण मिळाले. एका शेतमजुराच्या मुलीला ९० टक्के गुण मिळाल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. ही बातमी खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाचनात आली. त्यांनी सारिकाला भेटायला बोलावले. तिचं कौतुक केले. तुला पुढे काय व्हायचे आहे, असे सुप्रिया सुळेंनी सारिकाला विचारले तेव्हा
डॉक्टर व्हायचे असल्याचे तिने सांगितले.
डॉक्टर होण्याची तिची जिद्द पाहून खासदार सुळे यांनी सारिकाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलली आणि तिला पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला पाठविले. तिला कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. या शिक्षणासाठी लागणारा सर्व खर्च पुस्तके, राहण्याची व्यवस्था खासदार सुळे यांनी केले. सारिकाला आदिल फरास यांचीही बरीच मदत झाली. नुकतीच सारिका हिने बीएएमएस ही पदवी प्राप्त केली. सध्या सारिका खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत आहे.
एका सामान्य कुटुंबातून मिळविलेल्या यशाबद्दल महापौरांनी विशेष कौतुक केले. मी ज्या समाजातून पुढे आली आहे. त्या गरीब समाजातील लोकांची मला सेवा करायची असल्याचे सारिकाने सांगितले. (प्रतिनिधी)