लेकीचे आगमन, सुखाची चाहूल;मुलगी झाल्याच्या आनंदात बापाने घोड्यावरून गावभर जिलेबी वाटली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 11:53 AM2022-03-25T11:53:23+5:302022-03-25T11:55:02+5:30
मस्साजोग येथील मोरे कुटुंबीयांनी केले कन्याजन्माचे स्वागत; घोड्यावरून वाटली पन्नास किलो जिलेबी
केज : पहिले अपत्य जर मुलगी झाली तर गावात घोड्यावरून जिलेबी वाटण्याचा केलेला संकल्प मस्साजोग येथील मोरे कुटुंबीयांनी अखेर पूर्ण केला. लग्नानंतर चार वर्षांनंतर मुलगी झाल्याचा आनंद घोड्यावरून पन्नास किलो जिलेबी गावातील नागरिकांना वाटून साजरा करत या कुटुंबाने मुलीच्या जन्माचे आगळे स्वागत केले आहे.
तालुक्यातील मस्साजोग येथील बुवासाहेब मोरे यांना दोन मुले असून त्यांचा मुलगा अमरसिंह मोरे याचा विवाह चार वर्षांपूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथील यशोमतीसोबत झाला होता. लग्नानंतर अमरसिंह व यशोमती मोरे यांनी पहिल्या वेळेस मुलगी झाली तर गावात घोड्यावरून जिलेबी वाटण्याचे ठरवले. लग्नाच्या चार वर्षांनंतर अमरसिंह व यशोमती या दाम्पत्यास अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात १८ मार्च रोजी कन्यारत्न झाले. पहिल्या वेळेस कन्यारत्न झाल्याने आनंद गगनात मावेनासा झाला. पहिल्यांदा मुलगी झाल्यानंतर गावात घोड्यावरून जिलेबी वाटण्याच्या केलेल्या संकल्पानुसार मोरे कुटुंबीयांनी गावातील ग्रामस्थांना घोड्यावरून वाजत गाजत जिलेबी वाटली. यावेळी अमरसिंह मोरे यांचे भाऊ प्रीतम मोरे, वडील बुवासाहेब मोरे, चुलते अप्पासाहेब मोरे, भाऊ हिंदुराजे मोरे आदींसह मोरे कुटुंबीय उपस्थित होते. भ्रूण हत्यांचा कलंक लागलेल्या बीड जिल्ह्यात मुलीच्या जन्माचे स्वागत घोड्यावरून जिलेबी वाटून केले जात असल्याने सकारात्मक प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त झाल्या.
मुलगी झाल्यास घोड्यावरून जिलेबी वाटण्याचा केला होता निर्धार - अमरसिंह मोरे
लग्न झाल्यानंतर पहिले अपत्य हे मुलगी झाल्यास गावात घोड्यावरून जिलेबी वाटण्याचा निर्धार केला होता. लग्नानंतर चार वर्षांनी तुकाराम बीजेच्या दिवशी १८ मार्च रोजी मुलगी झाल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. केलेल्या संकल्पाप्रमाणे २० मार्च रोजी गावात घोड्यावरून जिलेबी वाटून कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केल्याचे अमरसिंह मोरे यांनी सांगितले.