सासूच्या तिरडीला खांदा देत सुनांनी तोडल्या अनिष्ट प्रथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 05:37 PM2019-09-09T17:37:10+5:302019-09-09T17:41:33+5:30
नेत्रदानाचा संकल्पसुद्धा झाला पूर्ण
बीड : एखादी व्यक्ती मयत झाल्यावर तिला पुरूषांनी खांदा देण्याची परंपरा आहे. मात्र, बीड शहरात सोमवारी सकाळी एक वृद्ध महिला मयत झाल्यानंतर तिला पुरूषांनी खांदा न देता तिच्या चार सुनांनी दिला. आतापर्यंत मुलींनी पाणी पाजले, मुखाग्नी दिला, अशा घटना घडलेल्या आहेत. मात्र, चार सुनांनी किंवा महिलांनी तिरडीला खांदा दिल्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
सुंदरबाई दगडू नाईकवाडे (८४ रा.काशीनाथ नगर, बीड) असे मयत वृद्ध महिलेचे नाव आहे. सुंदरबाई यांच्यावर दोन दिवसांपासून बीडमधील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, सुंदरबाई यांच्या तिरडीला त्यांच्या चार सुनांनी पुढाकार घेत खांदा दिला. लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे, मनिषा जालिंदर नाईकवाडे, मिना मच्छिंद्र नाईकवाडे अशी त्या सुनांची नावे आहेत. सुंदरबाई यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
नेत्रदानाची इच्छा पूर्ण
सुंंदरबाई यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांनी आपल्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांचे नेत्रदान करण्यास परवानगी दिली होती. आपणही मयत झाल्यावर आपलेही नेत्रदान करण्याची इच्छा त्यांनी मुलांजवळ व्यक्त केली होती. अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. जिल्हा रूग्णालयातील नेत्र विभागाच्या टिमने सोमवारी पहाटेपर्यंत शस्त्रक्रिया करून नेत्र संकलन केले.
सुंनाना दिले मुलीचे प्रेम
एकीकडे अनेक घरांमध्ये सासू-सुनाचे वाद टोकापर्यंत गेल्याची उदाहरणे आहेत. तर दुसऱ्या बाजुला नाईकवाडे कुटूंब आहे. सुंदरबाई या आपल्या सुनांना मुलीचे प्रेम देत होत्या. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर सर्व सुनांचे प्रेम दिसून आले. हा सर्व प्रकार पाहून उपस्थित तर आश्चर्यचकित झालेच शिवाय त्यांचा टाहो पाहून उपस्थितांनाही आश्रु अनावर झाले.
ए पोरी, नवी साडी घालना गं..
सुंदरबाई व त्यांची मोठी सून लता यांनी सोबत गौरींची पुजा केली. यावेळी लता यांनी जुनी साडी घातली होती. ‘ए पोरी, नवी साडी घालना गं..’ असे म्हणत त्यांनी तिला मायेचे प्रेम दिले. तिला नवी साडी घालण्याचा हट्ट धरला होता, असे राधाकिसन नाईकवाडे सांगितले.
नाती घट्ट व्हावी
रूढी, परंपरा बदलावी. सुनेबद्दल सासुचे आणि सासूबद्दल सुनेचे प्रेम कायम रहावे, तसेच नाते घट्ट व्हावे, या उद्देशाने हा सर्व प्रकार झाला. यासाठी आम्ही भावंडे आणि महिलांनी पुढाकार घेतला. नेत्रदानाची आईची इच्छाही पूर्ण केली.
- राधाकिसन नाईकवाडे, बीड