आईच्या पार्थिवाला मुलींनी दिला खांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:48+5:302021-05-21T04:35:48+5:30
भरून शिरूर कासार : तालुक्यातील जांब येथे गुरुवारी (दि.२०) पुरुष प्रधान रूढी, परंपरांना मोडीत काढणारी अंत्ययात्रा पाहायला मिळाली. ...
भरून
शिरूर कासार : तालुक्यातील जांब येथे गुरुवारी (दि.२०) पुरुष प्रधान रूढी, परंपरांना मोडीत काढणारी अंत्ययात्रा पाहायला मिळाली. मुलगा नसल्याने आपल्या आईच्या पार्थिवाला मुलींनीच खांदा दिला. मुखाग्नीदेखील मुलीनेच दिला.
मुलगा आणि मुलगी असा भेद करू नये प्रबोधन होत असले तरी पुरुषप्रधान संस्कृतीमुळे रूढी आणि परंपरांमध्ये पुरुषांचाच मान आजदेखील आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पुरुषांनी खांदा देण्याची प्रथा आहे. मुखाग्नी देण्याचा मान देखील त्यांचाच असतो.
शिरूर कासार तालुक्यातील जांब या गावी ही पद्धत सहा बहिणींनी मोडीत काढली आहे. जांब येथील लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे (९०) यांचे गुरुवारी (दि. २०) पहाटे ४.०० वा. सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे त्यांच्या पाच मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. त्यांना मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या पार्थिवास भावकीतील व्यक्ती आणि जावई खांदा देण्यास पुढे सरसावले. मात्र, मुलींनी त्यास नकार दिला.
संपूर्ण आयुष्य आईने मायेची ऊब दिली. तिचे ऋण फेडणे शक्य नाही. मात्र, तिच्या अंतिम प्रवासात तिच्या पार्थिवाला आपणच खांदा द्यावा, अशी इच्छा मुलीच्या मनात आली आणि त्यांनी ती बोलून दाखवली. उपस्थित सग्यासोयऱ्यांनीदेखील रूढी परंपरेला फाटा देत याला संमती दर्शविली.
सहा बहिणींनी आईला दिला निरोप
सुनीता केदार, विमल केदार, शशिकला केदार आणि भीमाबाई मोरे या चार मुलींनी पार्थिवास खांदा दिला. पार्थिवासमोर ताटात पाणी, उदबत्ती घेऊन लहान मुलगी शकुंतला पवार यांनी स्मशानभूमीकडे मार्गक्रमण केले.
अंत्ययात्रेची सर्व तयारी कचराबाई खंडागळे या मुलीने केली. आईच्या पार्थिवाला भडाग्नी देखील लहान मुलीनेच दिला. त्यामुळे रूढी परंपरांना फाटा देणाऱ्या या अंत्यविधीने समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. जेवढा मयत व्यक्तीच्या पार्थिवास खांदा देण्याचा अधिकार पुरुषांना असतो तेवढाच हक्क स्त्रीयांचा देखील असतो, हे आपल्या कृतीतून या बहिणींनी सिद्ध करून दाखवले आहे.
===Photopath===
200521\vijaykumar gadekar_img-20210520-wa0050_14.jpg