लेकीचे मिनीगंठन आईच्या गळ्यातून चोरी, परत मिळताच बीड पोलिसांचा केला सत्कार
By सोमनाथ खताळ | Published: March 28, 2024 03:23 PM2024-03-28T15:23:20+5:302024-03-28T15:23:39+5:30
बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले.
बीड : येथील बसस्थानकातून वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मिनीगंठन चोरी झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून महिला चोरट्याला बेड्या ठाेकत ते परत मिळवले. गुरूवारी ते संबंधित वृद्धेला पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते परत केले. यावेळी वृद्धेला भावना अनावर झाल्या. या महिलेसह त्यांच्या नातेवाईकांनी एसपी ठाकूर यांच्यासह एलसीबीच्या पथकाचा सत्कार केला.
सुलभा मनोज गाडे (वय ४५, रा. वाघोली, पुणे) या संजय धोंगडे (रा. गयानगर, बीड) या भावाच्या मुलीचे लग्न असल्याने २ फेब्रुवारी रोजी पुण्यावरून बीडला आल्या होत्या. येताना त्यांनी मुलीचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र गळ्यात घातले होते. लग्न उरकल्यानंतर त्या ५ मार्च रोजी दुपारी पुण्याला परत जाण्यासाठी बीड बसस्थानकात आल्या. बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला गती दिली. यात त्यांना गवळण पांडुरंग गायकवाड (वय ४०, रा. माउलीनगर, पेठ बीड) या महिलेने गंठन चोरल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून तिला मागील आठवड्यात बेड्या ठोकत तिच्याकडून दोन तोळ्याचे गंठन परत मिळवले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते गुरूवारी गाडे यांना पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते परत करण्यात आले.
एसपींसह एलसीबीच्या पथकाचा सत्कार
मिनीगंठन परत मिळताच सुलभा गाडे व त्यांच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह एलसीबीचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, हवालदार मनोज वाघ, प्रसाद कदम, विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, नारायण कोरडे, सुशीला हजारे, स्वाती मुंडे, सचिन आंधळे, चालक सुनील राठोड आदींचा सत्कार केला.