माजलगावात सोमवार ठरला आंदोलनाचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:20 AM2019-02-26T00:20:55+5:302019-02-26T00:21:19+5:30
धनगर समाजाला एसटी आरक्षणाची सरकार अंमलबजावणी करत नसल्याच्या निषेधार्थ माजलगाव धनगर समाज व मल्हार सेनेच्या वतीने निषेध साखळी धरणे आंदोलन येथील उपविभागीय कार्यालयासमोर करण्यात आली.
माजलगाव : धनगर समाजाला एसटी आरक्षणाची सरकार अंमलबजावणी करत नसल्याच्या निषेधार्थ माजलगाव धनगर समाज व मल्हार सेनेच्या वतीने निषेध साखळी धरणे आंदोलन येथील उपविभागीय कार्यालयासमोर करण्यात आली. तर ऊस बिलातील फरक त्वरित देण्यात यावा, यासाठी भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली परभणी टी पॉर्इंट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.तर आपल्या जमिनीतील फेर करण्यात यावेत, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर शेतकरी कोळसे यांनी उपोषण सुरु केल्याने माजलगावात सोमवार हा दिवस आंदोलन धरणे आणि उपोषणाचा दिवस ठरला आहे.
भाजपा-शिवसेना सरकारला सत्तेत येऊन साडेचार वर्षे झाले तरी धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने केली नाही. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई शेळी-मेंढी विकास महामंडळाला ५०० कोटी रु पये देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. समाजाची दिशाभूल करून ७० वर्षांपासून आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत ठेवल्यामुळे धनगर समाज अडचणीत सापडला आहे. सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ मल्हार सेनेच्या वतीने येथील विभागीय कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात तुकाराम येवलेसह इतर कार्यकर्ते सहभागी होते. त्याचप्रमाणे छत्रपती व सुंदरराव सहकारी कारखान्याकडे २०१६-१७ मधील प्रतीटन ६०० रु पये प्रमाणे जो फरक देण्यात आला नव्हता, तो व्याजासह देण्यात यावा. तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी नियमाप्रमाणे ऊस बिल द्यावे, तालुक्यातील परिक्षेत्रातील उसाला गाळपासाठी पूर्ण प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे २०१७-१८ चे २५० रुपयांचा फरक लेखी कबूल करून जय महेशने काही लोकांना अठराशे तर काहींना २ हजार ५०० रु पये भाव देऊन दुजाभाव केला आहे. त्या फरकातील २५० रुपये रक्कम त्वरित देण्यात यावी या व विविध मागण्यांसाठी भाई थावरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रास्ता रोको करण्यात आला.
तर आपल्या जमिनीतील फेरफार करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी बंडू कोळसे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.