'नदीपात्रात मृतदेह, काठावर रक्ताचा सडा'; गतिमंद युवकाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 01:32 PM2021-10-16T13:32:35+5:302021-10-16T13:34:20+5:30
Crime In Beed : नदीकाठी रक्ताचा सडा दिसत असल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
कडा (बीड ) : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका गतिमंद युवकाचा आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील नदीपात्रात शुक्रवारी दुपारी मृतदेह आढळून आला. ईश्वर त्र्यंबक सुरवसे ( ३८ ) असे मृत युवकाचे नाव आहे. नदीकाठी रक्ताचा सडा दिसत असल्याने हा खून असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर हत्या की आत्महत्या याची पुष्ठी होईल.
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील ईश्वर त्र्यंबक सुरवसे हा गतिमंद आहे. मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी डोईठाण जवळील पुलाखाली ईश्वरचा मृतदेह नदी पात्रात तरंगताना आढळून आला. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आली. ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची अवस्था पाहून जाग्यावरच शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पंचनामा पोलिस नाईक संजय गुजर यांनी केला आहे.
खुनाचा संशय ?
नदीकाठी रक्ताचा सडा दिसत असल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. खून केल्यानंतर मृतदेह पाण्यात फेकण्यात आला असावा अशी चर्चा आहे. शवविच्छेदन अहवालानंतर याबाबत अधिक माहिती मिळेल. वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रशांत गिरी यांनी पाच दिवसात अहवाल प्राप्त होईल अशी माहिती दिली.