रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये स्त्री जातीचे मृत अर्भक; कुमारी मातेसह २ महिला ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 04:29 PM2022-12-13T16:29:33+5:302022-12-13T16:30:03+5:30
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासात आढळून आल्या तीन संशयास्पद महिला
अंबाजोगाई (बीड): येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या शौचालयात बकेटमध्ये एक दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक २ डिसेंबर रोजी आढळून आले होते. या प्रकरणी कुमारी मातेसह व दोन महिलांना पोलीसांनी चौकशी ताब्यात घेतले आहे.
स्वाराती रुग्णालयाच्या अपघात विभागात दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता येथील सफाई कर्मचारी मोहन राठोड शौचालयात सफाई करत होते. यावेळी त्यांना एका बकेटमध्ये पाण्यात बुडालेले स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले. राठोड यांनी वरिष्ठांच्या सुचनेवरून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात कलम 318 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भागवत कांदे व त्यांचे सहकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश भोले यांनी करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीचे फुटेजच्या तपासणीत अपघात विभागात ३ महिला संशयास्पदरित्या फिरताना दिसून आल्या. तसेच अपघात विभागांमधून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी संपूर्ण बीड जिल्ह्यात शोध घेण्यास सुरुवात केली.
तपासा दरम्यान धारूर तालुक्यातील एका गावात सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या तीन महिलांशी साम्य असणाऱ्या तिघींना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी १९ वर्षीय कुमारी मातेने 2 डिसेंबर रोजी आई आणि शेजारील एका महिलेसह स्वाराती रुग्णालयात आल्याचे कबूल केले. उपचारासाठी गेल्यानंतर रुग्णालयाच्या शौचालयातच तिची प्रसूती झाली. यानंतर तिने बकेटमध्ये स्त्री जातीचे अभ्रक टाकले. यावेळी हे अर्भक मृत होते की नाही याचा शोध सुरू आहे.
दरम्यान, कुमारी मातेची वैद्यकीय तपासणी, अर्भकाची तपासणी, डीएनए व इतर तपासण्या केल्यानंतर अधिक माहिती मिळणार आहे. या कुमारी मातेचे शेजारील गावातील चार मुलांचा पिता असलेल्या विवाहित पुरुषासोबत प्रेम संबंध होते. यातूनच ती गर्भवती राहिली असल्याची माहिती आहे. याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती प्सहाय्यक फौजदार कांदे यांनी दिली.