मुदत संपली अन् मागणी सुद्धा नाही, बीड जिल्ह्यातील सर्व टँकर बंद
By शिरीष शिंदे | Published: July 9, 2024 12:52 PM2024-07-09T12:52:06+5:302024-07-09T12:52:25+5:30
ग्रामीण भागातून टँकरची सध्या तरी नाही मागणी
बीड : ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मुदत ३० जून होती व महिन्याभरात चांगला पाऊसही झाला आहे. या दोन्ही कारणांमुळे बीड जिल्ह्यातील सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातून टँकरची मागणी सध्या तरी नाही. परंतु मागणी झाल्यास टँकर सुरू केले जाणार आहेत.
जिल्ह्यात जून महिन्यात व त्या आधी झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील परिस्थिती बदलली. हळूहळू टँकरच्या मागणी कमी होऊ लागली. ७ जून रोजी बीड जिल्ह्यात ४६७ टँकर सुरू होते, तर २७ जून रोजीच्या अहवालानुसार २७७ टँकर सुरू होते. वास्तविकत: शासन निर्णयानुसार, पाणीटंचाई उपाययोजना म्हणून ३० जूनपर्यंतच टँकर पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर टँकर बंद करून आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू ठेवले जाणार होते. परंतु जून महिन्यात झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील पाणी परिस्थितीमध्ये सुधारणा झाली. परिणामी, सर्व ठिकाणी असलेले टँकर बंद करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास ज्याठिकाणी टँकरची मागणी होईल, त्या गावामध्ये पुन्हा टँकर सुरू केले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद
बीड जिल्ह्यात जून महिन्यात वेळोवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्या आधारावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जून महिन्यात आष्टी तालुक्यातील कडा या गावांसह इतर ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. चांगला पाऊस झाल्यामुळे पाटोदा, आष्टी, शिरूर या भागात पाणीटंचाईचे संकट तूर्त टळले आहे.
टँकर पुरवठ्यासाठी ३० जूनची मुदत होती. तसेच मागील महिन्यात चांगला पाऊसही झाला. तसेच तहसीलदारांनी टँकरसाठीचे प्रस्ताव नसल्याचे सांगितले. टँकरसाठी मागणी आल्यास मंजूर केले जातील.
-शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड