कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्राथमिक नोंदणीसाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:24 PM2020-03-11T23:24:43+5:302020-03-11T23:25:28+5:30
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांना शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्र ीसाठी संबधित कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्राथमिक नोंदणी करण्यासाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
बीड : जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतक-यांना शासकीय कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्र ीसाठी संबधित कृषी उत्पन्न बाजार समितीकडे प्राथमिक नोंदणी करण्यासाठी १३ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील कापूस खरेदी सुरळीत होण्यासाठी सर्व बाजार समित्यामध्ये १ मार्च २०२० पर्यंत शेतक-यांना प्राथमिक नोंदणी करण्यासाठी सूचित करण्यात आले होते. कापूस विक्र ीसाठी शेतक-यांची प्राथमिक नोंदणी ४ मार्च २० पासून संबधित कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत सुरु करण्यात आली होती परंतु, नोंदणी सुरु असतांना अद्याप ब-याच शेतक-यांची प्राथमिक नोंदणी शिल्लक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे १३ मार्च २० पर्यंत ही मुदत वाढविल्याच्या सूचना कृषी उत्पन्न बाजार समितींना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रे सुरु असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी शेतक-यांची प्राथमिक नोंदणी १३ मार्च २० पर्यंत पूर्ण करु न घ्यावी, अशा सूचना सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
प्राथमिक नोंदणी करण्यासाठी ही अंतिम मुदत असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच प्राथमिक नोंदणी केल्याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीकडून टोकन दिले जाणार नाही. ज्या शेतक-यांचा कापूस विक्र ी करणे बाकी आहे अशा शेतक-यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील बाजार समितीमध्ये कापसाची नोंदणी करावी. नोंदणी करतांना कापूस पे-याची नोंद असलेला ७/१२ व ८ - अ, आधार कार्डची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे बाजार समितीमध्ये सादर करावीत. सर्व बाजार समित्यांनी मार्केट यार्डमध्ये शेतक-यांचे कापूस नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झालेली पावती शेतक-यांना देण्यात यावी. जे शेतकरी वरील मुदतीत नोंदणी करणार नाहीत, त्यांना टोकन दिले जाणार नाही, याची सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. कापूस उत्पादक शेतक-यांने आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहून नोंदणी करावी. प्रति हेक्टर २० क्विंटल या मयादेपर्यंत व एकाच कुंटुंबातील दोनपेक्षा जास्त व्यक्तीची व एकगठ्ठा पध्दतीने नोंदणी करून घेऊ नये. ज्या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु नाही, त्या बाजार समित्याचे कार्यक्षेत्रातील कापूस जवळच्या बाजार समितीने प्राथमिक नोंदणी करून घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.