गोवर-पेन्टा लस दिल्यानंतर दुस-या दिवशी बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 07:52 PM2018-01-28T19:52:03+5:302018-01-28T19:52:13+5:30
परळी शहरातील वडसावित्रीनगरातील एका ९ महिन्यांच्या बाळाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. गोवर-पेन्टा लस दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
बीड : परळी शहरातील वडसावित्रीनगरातील एका ९ महिन्यांच्या बाळाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. गोवर-पेन्टा लस दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी प्रसंगी फॉरेन्सिक लॅबला नमुने पाठविले जाणार आहेत.
शहरातील वडसावित्रीनगर भागातील निकिता नंदू जाधव या ९ महिन्यांच्या बाळाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. ९ महिने आणि दीड वर्षे झालेल्या बालकांना आरोग्य विभागाच्या वतीने गोवर- पेन्टा लस दिली जाते. आरोग्यसेविका आणि आशा स्वयंसेविकांनी वडसावित्रीनगर भागातील अंगणवाडीत शनिवारी संबंधित बालकांना लस दिली होती. रविवारी निकिता हिला ताप आला, अंगावर लाल फोड आले, तिचा मृत्यू हा लस दिल्याने झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी त्यांची समजूत काढत शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित जबाबदार व्यक्तींविरुद्ध कारवाई करता येईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी बाळाचे प्रेत अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात नेले. या परिसरातील लक्ष्मी गवळी नामक दीड वर्षाच्या मुलीला लस दिल्यानंतर ताप आला होता, तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच या भागातील ७ बालकांना लस दिलेली आहे, त्यांना मात्र कुठलाही त्रास दिसून आलेला नाही. नातेवाईकांनी केलेला आरोप आणि रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांनी मांडलेली बाजू पाहता शवविच्छेदन अहवालानंतर निकिताच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. वेळ पडल्यास फॉरेन्सिक लॅबला नमुने पाठविले जाणार आहेत. त्या अहवालावरच पुढील दिशा ठरणार आहे.
निकिता जाधव नामक नऊ महिन्याच्या बाळास गोवर-पेन्टा डोस शनिवारी देण्यात आला होता. तिला दिवसभर त्रास नव्हता. सकाळी देखील त्रास नव्हता. मात्र दूध पिऊन बाळ झोपल्यानंतर साडेनऊच्या सुमारास पालकांनी बाळाला रुग्णालयात आणले ते मृतावस्थेत होते. डोस दिल्यानंतर ३ ते ४ तासात रिअॅक्शन येते. इतर सात बाळांनाही असाच डोस देण्यात आला होता. त्यांना मात्र कोणताही त्रास झालेला नाही. त्यामुळे निकिताचा मृत्यू लसीकरणामुळे झाला असे प्रथमदर्शनी वाटत नाही.
- डॉ. संजय गित्ते, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परळी